Ticker

6/recent/ticker-posts

श्रीरामतांडा जि.प.शाळेतील दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा:- केंद्रीय नवोदय विद्यालय समिती मार्फत जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.यामध्ये मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामतांडा या शाळेतील आरव केशव सरकटे व स्वराज किशोर निर्वळ हे दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र ठरले असून या यशाने शाळेची स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम राहिली आहे.

             मुख्याध्यापक पदाचा पदभार असतानाही पाचवी वर्गाचे वर्गशिक्षक श्री अविनाश लोमटे यांनी नवोदय प्रवेश पात्र परीक्षेचे जादा वर्ग 1 मार्च 2024 पासून नियमित घेऊन तयारी करून घेतली तसेच जवळपास 175 सराव परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात आले होते.त्यामुळेच हे दैदिप्यमान यश शाळेने मिळविले आहे. जिल्हाधिकारी माननीय डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून तसेच डाएटचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कांबळे व जिल्हा परिषद जालना चे शिक्षणाधिकारी श्री कैलास दातखीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली महादीप सहल परतीच्या प्रवासाने जालना येथे येत असताना नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असल्याने जालना रेल्वे स्थानकावर दिमाखदार कार्यक्रम आयोजित करून महादीप हवाई सहलीचे प्रमुख तथा उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.संजय येवते उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, सहल सदस्य पुंजाराम रायमल, संतोष भिसे,श्रीमती जिजा वाघ श्रीमती अर्चना नरवडे डॉ.गोदावरी उगले,आरोग्य अधिकारी डॉ.शितल शिनगारे यांनी जिल्हा परिषद जालना व डायट जालना यांच्या वतीने आरव सरकटे स्वराज निर्वळ,अवधूत जोशी या विद्यार्थ्यांचा व नवोदय परीक्षेची तयारी करून घेणारे वर्गशिक्षक व महादीप हवाई सहल सदस्य श्री अविनाश लोमटे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी महादीप सहलीतील सर्व विद्यार्थी,त्यांचे  पालक व शिक्षक उपस्थित होते.