आष्टा /प्रतिनिधी
आष्टा शहरातील पाणंद रस्त्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटावेत यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निशिकांत भोसले पाटील यांनी निवेदन दिले. त्याचबरोबर गांधीनगर, दत्त वसाहत आणि साईनगर मधील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ चा प्रश्न लवकरच सोडवण्यात यावा, अशी मागणी केली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना रेठरे धरण येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने उपस्थित होते.
आष्टा शहरातील अनेक पाणंद रस्त्यांची दुरावस्था असून याबाबत अनेक अडचणी आहेत. या रस्त्यांची कामे होण्यासाठी भरघोस निधी देण्याची मागणी ही केली. त्याचबरोबर आष्टा शहरात सर्वात मोठा आणि प्रलंबित असणारा प्रश्न गांधीनगर, साईनगर आणि दत्तवसाहत येथील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ या जमिनीच्या प्रश्नाबाबत निशिकांत भोसले पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर माहिती दिली. तसेच हाही प्रश्न तत्काळ मार्गी लागावा अशी मागणी करून निवेदनही दिले.
याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आष्टा शहरातील पाणंद रस्त्यांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली. तसेच साईनगर, दत्त वसाहत, गांधीनगर येथील जमिनीचा प्रश्न योग्य मार्गाने सुटावा यासाठीही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.a





Social Plugin