बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
नांदेड : एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून उष्म्याची तीव्रता वाढत चाललेली असतानाच, नांदेड शहरात मोठ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या पंधरवाड्यातील तिसरा अग्निप्रलय सोमवारी मध्यरात्री बघायला मिळाला. कोट्यवधींची मालमत्ता खाक करणार्या या भीषण आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण अग्निशमन दलाच्या आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.शहरातील महावितरण विभागाच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या पांपटवार सुपर मार्केटला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याचा संदेश स्थानिक अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर या विभागाचे प्रमुख के.एस.दासरे व इतर अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सुपर मार्केटमध्ये तब्बल १२ गॅस सिलिंडर असल्याचे समजल्यानंतर ते तात्काळ बाहेर काढण्यात आले. तसेच मार्केटच्या वरच्या भागात राहणार्या सहा जणांना अगोदर बाहेर काढत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू करण्यात आले.
पांपटवार सुपर मार्केटमध्ये किराणा, भुसार, मिरची-मसाल्यांसह खाद्यतेलाचा साठाही होता. त्यातच दुकानातील वातानुकुलित यंत्रणेचा कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. पण दासरे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही आग आजूबाजुच्या दुकानांमध्ये पसरु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे ही आग केवळ पांपटवार मार्केटपुरतीच मर्यादित राहिली. तब्बल आठ तास शर्थीचे प्रयत्न आणि २२ अग्निशमन बंबांचा वापर केल्यानंतर सकाळी ही आग आटोक्यात आली. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यावर पोलिसांनी योग्य ते नियंत्रण ठेवले.
अग्निशमन विभागाकडे मिळालेल्या माहितीनुसार वरील दुर्घटनेत सुमारे चार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तीन मोटारसायकली होत्या. त्यावेळीच बाहेर काढण्यात आल्या. तसेच ६० हजारांचा माल बाहेर काढण्यात आला. पांपटवार यांच्या घरासह शेजारी असलेले ओमसाई फर्निचर व इतर इमारतींना आगीची झळ बसणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.
वरील घटनेनंतर एकाच कुटुंबात १२ गॅस सिलिंडर आढळून आल्यामुळे तो चौकशीचा विषय झाला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आणि नंतर पसरली, असे संबंधितांचे म्हणणे आहे. शहरातल्या देगलूर नाका परिसरात मागील आठवड्यातच इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या दालनाला आग लागली होती. त्यात ३० लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याच्या काही दिवस आधी शहरालगतच्या मालटेकडी परिसरात फर्निचरच्या एका गोदामाला लागलेल्या आगीतही मोठे नुकसान झाले होते. गेल्या आठवड्यातच अग्निशामक सेवा सप्ताह पार पडला. या दरम्यान आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाभर प्रबोधन करण्यात आले. पण अनेक ठिकाणी मानवी चुकांमुळेच आगी लागत असल्याचे दासरे यांनी सांगितले.
मद्यपींचा 'प्रताप' गेल्या पावणेदोन महिन्यांत नांदेड शहरात मोठ्या आगीच्या चार, साधारण आगीच्या सहा, डम्पिंग ग्राऊंडवरील आगीच्या दोन, महावितरणच्या रोहित्रांना आग लागण्याच्या सहा घटनांची नोंद झाली. नांदेड पोलिसांनी अलीकडच्या काळात शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यालगत मद्यप्राशन करणार्यांवर कारवाया सुरू केल्यानंतर या मद्यपींनी आपला मोर्चा शहराच्या आसपासच्या झाडीझुडपांकडे वळवला. मद्यप्राशनासोबत धुम्रपान करून जळती सिगारेट किंवा पेटती काडी झुडपांमध्ये टाकल्यामुळे चौदा ठिकाणी आग लागल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे झाली.
Social Plugin