बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता . खटाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांचा डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. संबंधित विभागाने जनावरांच्या वैद्यकीय उपचाराबाबत त्वरित उपाययोजना करावी अन्यथा ग्रामस्थांच्या रोशाला बळी पडावे लागेल, असा इशारा दिला आहे.
पुसेगाव आणि परिसरासाठी जनावरांच्या वैद्यकीय उपचाराकरिता शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना सुरू केला आहे. गेली अनेक वर्ष पंचक्रोशीतील जनावरांची मोठ्या प्रमाणात येथे विविध रोगासंदर्गी सुश्रूषा केली जाते. मात्र मागील दहा वर्षात पाळीव जनावरांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. याशिवाय खाजगी पशुवैद्यकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याने शासकीय पातळीवरच्या यंत्रणेवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडालेला आहे.
मुळातच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, सरकारची अनास्था, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि शेतीचे यांत्रिकीकरण यामुळे ही यंत्रणा कोलमडलेली असल्याचे दिसते. याचबरोबर शेतीशी निगडित असणाऱ्या जनावरांच्या राखणदारीचा प्रश्न व शेती व्यवसाय हाच आत भट्ट्याचा झाल्यानेपशुधनाची समस्या निर्माण झाली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रश्नाबाबत यापूर्वीही ग्रामस्थांच्या तक्रारी शासन दरबारी मांडलेल्या आहेत. परंतु या प्रश्नाचे कोणालाच सोयरसुतक नसल्याने त्याची सोडवणूक होणे अपेक्षित नाही.
मागील दोन दिवसांपूर्वी येथील नितीन रमेश देशमुख यांच्या मांजराला पायाची दुखापत झाली होती. यासंदर्भात त्यांनी अनेकदा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये चकरा मारल्या मात्र तेथे कोणीही उपस्थित नसल्याने त्यांची तारांबळ झाली. शेवटी त्या मांजराचा उपचाराविना एक पाय कायमचा काढावा लागला. तसेच त्याला उपचारासाठी सातारा व कोल्हापूरपर्यंत नेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाई म्हशीसाठी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर्सनाच बोलावल्या वाचून पर्याय नसल्याचे सांगितले. परिणामी शेतकऱ्यांची अडवणूक करून खाजगी यंत्रणा पैशाची लूट करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. येथील विधानसभा मतदारसंघाचे महेश शिंदे यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या असून येत्या काही दिवसात यावर संबंधित प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही न केल्यास आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे ही सांगितले आहे.
Social Plugin