Ticker

6/recent/ticker-posts

ट्रकच्या धडकेत वडील व मुलगी जागीच ठार मुरंबी फाट्याजवळील घटना



कारंजा (लाड) पराग कु-हे प्रतिनिधि

जोरदार धडक दिल्याने वडील व मुलगी जागीच ठार झाले. तर पत्नी जखमी झाली. ही घटना १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर -संभाजीनगर महामार्गावरील शेलूबाजार रस्त्यावरच्या मुरंबी फाट्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, वडील अंबादास प्रल्हाद जावळे (४०) व मुलगी आरती जावळे (१०) अशी मृतकांची तर पत्नी उषा अंबादास जावळे (२५, तिघेही रा. धाकली किनखेड ता. बार्शीटाकळी जि. अकोला) असे जखमीचे नाव आहे. हे तिघे कारंजा येथील दवाखान्याचे काम आटोपून एमएच ३७ एजे ०४८७६ क्रमांकाच्या दुचाकीने परत धाकली (किनखेड) येथे जात होते.

मार्गात शेताचा धूरा पेटवल्याने समोर धूर पसरला होता. त्यामुळे दुचाकीथांबवून हे तिघे रस्त्यावर उभे असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत अंबादास जावळे व आरती जावळे हे वडील व मुलगी जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांच्या शरीराचा काही भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. घटनेनंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जय गजानन रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक दीपक सोनवणे यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली.

त्यांनी व अनिकेत भेलांडे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह व जखमीस येथील रुग्णालयात आणले. जखमीवर येथे उपचार करण्यात आले असून, घटनेचा अधिक तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे