Ticker

6/recent/ticker-posts

दहा बाय दहाच्या खोलीत अभ्यास करून आर्याने स्वप्नांचा पाठलाग केला, बारावी परीक्षेत ८६.८३%गुण मिळवत खटाव केंद्रात प्रथम



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

खडतर परिस्थितीवर मात करीत, अथक मेहनतीच्या जोरावर व नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून येथील शहाजीराजे महाविद्यालयात इयत्ता बारावी शास्त्र शाखेत शिकणाऱ्या आर्या अनिल राजे या विद्यार्थिनीने ८६.८३% गुण मिळवून खटाव केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. घरची बेताची परिस्थिती असल्याने आर्याने खासगी क्लास न लावता कॉलेजमधील शिक्षकांचे मार्गदर्शन घेत व घरी युट्यूबच्या साह्याने नेत्रदीपक यश संपादन केले व आपल्या आईवडिलांचे नाव उंचावले तसेच इतर होतकरू विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. आर्यांची घरची परिस्थिती बेताची आहे.दहा बाय दहाच्या घरात आर्याने कसलीही सबब न सांगता स्वतःला जुळवून घेतले व अविचलितपणे अभ्यास करत जवळपास सर्वच इयत्तेत सातत्याने लक्षवेधी कामगिरी बजावत आली. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही तिने अशीच चुणुक दाखवत ९४.८१ गुण मिळवले होते. वडील अनिल शेती नसल्याने वडिलोपार्जित कुंभार काम करतात.तर आई वनिता गृहिणी आहेत. अलीकडच्या काळात या पारंपारिक व्यवसायाला देखील घरघर आली असल्याने वडिलांना हाताला मिळेल ते काम करावे लागते. वडील अनिल यांना स्वतःचे पदवीचे वर्ष परिस्थितीमुळे पूर्ण करता आले नाही याची सतत मनाला खंत वाटते.आता आपले अपूर्ण स्वप्न लेकरांनी साकार करावे म्हणून त्यांनी पायाला भिंगरी लावून रात्रंदिवस काम करत आहेत. ते खेडोपाड्यात लग्नाचा गोंधळ घालण्यासाठी गोंधळी म्हणूनही काम करतात.

घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने आर्याने खासगी क्लास न लावता कॉलेजमध्ये प्रत्येक लेक्चर लक्षपूर्वक करत घरी युट्यूबच्या साह्याने कठीण विषयांचा अथकपणे आठ ते नऊ तास अभ्यास केला. इंजिनिअरिंग पूर्ण करून आर्याचे सिव्हिल सर्व्हिसमध्ये करिअर करण्याचे स्वप्न आहे.आयुष्यात असलेल्या आव्हानांना जिद्दीने सामाेरे जात आर्याने बारावीच्या परीक्षेचा अवघड टप्पा यशस्वीरित्या गाठला आहे. कष्टांना संयम आणि नियोजनबद्ध अभ्यासाची जोड देत तिने उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. आईवडील व गुरुजनांना आदर्श मानणार्या आर्याचाशिक्षणात फार मोठी शक्ती असून शिक्षणच आयुष्याचा मार्ग प्रशस्त करू शकते असा ठाम विश्वास आहे.

 विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामीण भागातील आर्या राजे होय. कुठलीही खाजगी शिकवणी न लावता केवळ सोशल मीडियाच्या आधारे अभ्यास करून नेत्रदीपक यश मिळवले आहे. कुंभार काम करत चिखलाच्या गोळ्यांना आकार देणाऱ्या बापाला पोरीच्या यशाने नवी उमेद मिळाली आहे. तिच्या यशामुळं कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं, कुटुंबात इतके गुण कोणाला मिळाले नाहीत. याचा आनंद आहे, असं आर्याचे वडील अनिल यांनी सांगितलं. तसंच, निकाल लागल्यावर आई आणि आजोबा आनंदाने भावुक झाले. तिने यापुढेही असाच अभ्यास करत मोठं व्हावं, अशी मनोकामना कुटुंबीयांनी व्यक्त केली.