Ticker

6/recent/ticker-posts

विसापूरात ६ मेला उडणार सोनेरी बैलगाडी शर्यतीचा धुरळा



सोन्याचे बक्षीस असणारे बैलगाडी मैदान  

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

विसापूर ता.खटाव येथील श्री वाघेश्वरी व नवलाई देवी यात्रोत्सवानिमित  मानाचे सोनेरी हिंदकेसरी बैलगाडी शर्यत मैदान ६ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता येथील विसापूर - जाखणगाव रोडवरील श्रीराम पत्रा कंपनी समोरील मैदानात होईल. यंदाची ही भव्य बैलगाडी शर्यत जास्तीत जास्त आधुनिक साधनांचा वापर करून पारदर्शकरित्या पार पाडली जाईल, अशी माहिती  सरकार, रिंग चिंगी व गोल्डन ग्रुप  यांनी दिली.

शर्यतीमधील प्रथम ७ क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना सोन्याचे हॉलमार्किंग केलेले सोने अनुक्रमे २५ ग्रॅम, २० ग्रॅम,  १५ ग्रॅम, १० ग्रॅम, ८ ग्रॅम, ६ ग्रॅम, ५ ग्रॅमचे विविध सोन्याचे अलंकार बक्षीसरुपी दिले जाणार आहेत.  एक ते सात क्रमांकाच्या विजेत्या बैलगाड्यांना प्रत्येकी एक ढाली देऊन सन्मानित केले जाईल. प्रथम क्रमांकाच्या गाडीच्या ड्रायव्हरला श्री वाघेश्वरी - नवलाई हिंदकेसरी ड्रायव्हर या किताबाने सन्मानित केले जाईल.

गाड्यांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंद दि. ५ मे अखेर सायंकाळी  ५ वाजेपर्यंतच नोंद घेतली जाईल. मैदानादिवाशी  बैलगाड्यांच्या नोंद घेतली जाणार नाही. गटाच्या चिठ्ठ्या ५ मेला सायंकाळी ६ वाजता आयोजक, स्थानिक पंच कमिटी, बैलगाडी संघटना पदाधिकारी, मालक व सर्वांसमक्ष ऑन कॅमेरा (युट्युब लाईव्ह) पेटीतून काढून पारदर्शक लॉट्स पाडले जातील. पहिला फेरा ठीक सकाळी ९ वाजता सोडला जाईल. टाईम लिमिटसाठी बझर असेल.

या शर्यतीसाठी मैदानाची आदर्शवत रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू आहे. मैदानात उत्कृष्ट धावपट्ट्या, बॅरिगेट्स, प्रेक्षक गॅलरी, ड्रोन कॅमेरे, लाईव्ह कॅमेरे, मोठ्या स्क्रीन, लाईव्ह प्रक्षेपण, जनावरांना चारा-पाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था तसेच आरोग्यविषयक आणि आवश्यक त्या सर्व सोयिंसुविधांची सोय केली जाईल.

महाराष्ट्रात अनेक यात्रा व उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडी शर्यती संपन्न होत असतात. परंतु विसापूर येथे प्रथमच बैलगाडी शर्यतीसाठी सोन्यांची सर्व बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे सोनेरी बैलगाडी शर्यतीच्या मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिल्लार आणि म्हैसुर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांची झलक पाहायला मिळेल. तसेच या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली बैलजोडी सोनेरी मानाच्या हिंदकेसरी किताबाने गौरविली जाणार आहे.बैलगाडी क्षेत्राला चांगली दिशा देणारं आदर्शवत असं यंदाच विसापूरचं मैदान होण्यासाठी सरकार, रिंग चिंगी व गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी  विशेष परिश्रम घेत आहेत.


*बैलगाडी शर्यती पारदर्शक होणार : सागरभाऊ साळुंखे*


विसापूरच्या यंदाच्या सोनेरी बैलगाडी शर्यती पारदर्शक व शासनाच्या निर्णयास आधीन राहून होतील. मैदानात विसापूरची गाडी पळविली जाणार नाही. बैलगाड्या शर्यती पारदर्शक होतील कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.    - श्री सागरभाऊ साळुंखे, माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती सातारा


अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बैलगाडी नाव नोंदणीस शुभारंभ करण्यात आला आहे. ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने बैलगाड्यांच्या नोंदी केल्या जाणार आहेत.  तरी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्यांची नोंद करून सहकार्य करावे. -योगेशशेठ साळुंखे,  उद्योजक, सोने चांदी