गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी शुक्रवारी उसळला! समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉलचे दरवाजे उघडले.शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाटगे पाटलांनी गुळज आणि तळनेवाडी येथील कॅनॉलचे अडथळे झुगारून लावले आणि हक्काचं पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं.
अंबड-घनसावंगी तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना,पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुक्या जनावरांसाठी त्राहिमाम असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळेझाक करत होते. जायकवाडी धरणात पुरेसा साठा असूनही गोदाकाठच्या गावांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चालढकल केली जात होती.या प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.
अखेरीस,सतीश घाटगे पाटील यांनी या असंतोषाचं नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला. शुक्रवारी,त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरील गुळज आणि तळनेवाडी कॅनॉलकडे कूच केली.संतप्त शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले.घाटगे पाटील आणि शेतकऱ्यांनी स्वतःकॅनॉलचे दरवाजे उघडले आणि अडवलेलं पाणी अखेर गोदावरीच्या दिशेने मार्गस्थ झालं.या निर्णायक क्षणी शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि घाटगे पाटलांच्या हिमतीला सलाम केला.या आंदोलनात भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे,आसेफ कुरेशी,दत्ता लोने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
घनसावंगी-अंबड तालुक्यातील दुष्काळी गावांची परिस्थिती लक्षात घेऊन पाट बंधारे विभागाने लवकरच हे पाणी सोडायला पाहिजे होत.परंतु पाट बंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.आम्ही सरकारला बदनाम होऊ देणार नाही.त्यामुळे शेतकरी हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.येत्या दोन दिवसात मंगरूळ,शिवनगाव,जोग्लादेवी बंधाऱ्यात एस्केप गेट उघडून पिण्यासाठी पाणी न सोडल्यास तिथले एस्केप गेट उघडून आम्ही पाणी खुले करणार आहोत. -सतीश घाटगे पाटील,
भाजपा नेते तथा चेअरमन समृद्धी शुगर्स अधिकाऱ्यांची झाली बोलती बंद
कॅनॉलचे दरवाजे उघडले जात असताना,धावतपळत आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.मात्र,सतीश घाटगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांची व्यथा आणि प्रशासनाची निगरगठ्ठ भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली,ज्यामुळे अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.संतप्त शेतकऱ्यांनीही अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला."धरणात पाणी असूनही जर आमच्या शेतकऱ्यांच्या जनावरांना प्यायला पाणी मिळत नसेल,तर या कॅनॉलच्या पाण्याचा काय उपयोग? अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि गावकरी पाण्यासाठी तडफडत आहेत.म्हणूनच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले,"असे खडे बोल घाटगे पाटील यांनी सुनावले.
Social Plugin