बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
शिवपुरी ता.पाटण येथे गुरुवार दि. २२ व शुक्रवार दि.२३ रोजी श्री सिध्देश्वर व विरभद्र देव संस्थान मठात विविध मूर्तींची स्थापना व प्राणप्रतिष्ठा तसेच काशी जगद्गुरुंचा अड्डपालखी सोहळा, अय्याचार शिवदिक्षा विधीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम जंगम , रवींद्र जंगम ( सर ) यांनी दिली
शिवपुरी हे निसर्गसंपन्न वनराईने नटलेले जंगम कुटुंबीयांचे छोटेसे गाव आहे. येथे जाण्यासाठी तारळे येथून मार्ग आहे. या ठिकाणी श्री सिध्देश्वर हे महादेवाचे पुरातन मंदिर असून वीरभद्र देव मठ संस्थान म्हणूनही अलिकडे प्रसिध्दीस आले आहे. प्रतिवर्षी वीरभद्र देवाचा गुग्गुळ व जुगाई देवीची सासनकाठी उत्सव कार्तिक महिन्यातील प्रदोष शिवरात्रीस मोठ्या उत्साहात होत असल्याचे सुभाष जंगम , अरुण जंगम , लिंगराज जंगम , प्रभुलिंग जंगम, कैलास जंगम, यांनी सांगितले. इतिहास प्रसिद्ध या मंदिरातील जुन्या भग्न मूर्तींच्या जागी श्री गणपती , वीरभद्र , बाणलिंग , हनुमान व लक्ष्मी या देव - देवतांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा श्रीमद काशी पीठाचे श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींजींच्या अमृतहस्ते होणार आहे. याप्रसंगी आदरणीय श्री ष.ब्र.१०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळंकी, श्री ष ब्र १०८ डॉ.निलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य महाराज वाई, श्री ष ब्र १०८ मणिकंठ शिवाचार्य महाराज लक्ष्मी दहिवडी उपस्थित राहणार असल्याचे महेश शास्त्री, योगेश जंगम, वैभव जंगम, संजय जंगम , अनिल जंगम , सागर जंगम , विश्वेश्वर जंगम , समाधान जंगम यांनी सांगितले. गुरुवारी ता.२२ रोजी पहाटे पासून वीरशैवागमोक्त पध्दतीने राजसोपचार पद्धतीने मूर्तीवर विविध प्रकारचे संस्कार पूजन , होमहवन होणार असून दु.३ ते ५ काशी जगद्गुरुंच्या अड्डपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायं ६ ते ८ धर्मसभा होणार असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
शुक्रवार ता.२३ रोजी पहाटे पाच ते सात होमहवन , पीठ संस्कार व जगद्गुरुंच्या अमृतहस्ते यंत्रस्थापना , मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा शिवाचार्य व जंगम पुरोहितांच्या वेदमंत्राच्या घोषात होणार आहे .नंतर पूर्णाहूतीसह महामंगलारती होणार आहे. सकाळी ८ ते १० अय्याचार व शिवदिक्षा विधीचे आयोजन केले आहे. ११ ते १ धर्मसभा व मान्यवरांच्या सत्कारानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे शिवाजी जंगम , तुकाराम जंगम, सुनील जंगम, दिलीप जंगम, दत्तात्रय जंगम , अजित जंगम , राजेंद्र जंगम , भरत जंगम , किशोर जंगम , अविनाश जंगम, गणेश जंगम, उमेश जंगम यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवपुरी येथील समस्त जंगम बांधव परिश्रम घेत आहेत





Social Plugin