तालुका प्रतिनिधी गणेश कदम.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी नुकत्याच पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करत प्रकल्प संचालक संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली, लोहा पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागाचे प्रमुख दिनेश तेलंग यांनी त्वरित सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. घरकुल लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची पैशांची मागणी होऊ नये, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना कोणत्याही कर्मचाऱ्याने पैसे मागितल्यास त्वरित गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे स्पष्ट निर्देश सीईओ मेघना कावली यांनी दिले आहेत.
तसेच, घरकुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक मोबदला न घेता निस्वार्थ भावनेने सेवा द्यावी, असे स्पष्ट करत प्रशासनाने पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे घरकुल विभागात पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, गरजूंना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
Social Plugin