Ticker

6/recent/ticker-posts

वाजेगाव येथे कराड - चिपळूण रस्त्यावर पाणी.. पर्यायी रस्ता वाहून गेला.. प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर..



         पाटण ( दिनकर वाईकर) 

काल रात्री पासून कोयना परिसरासह पाटण तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने जोर धरला असताना या पावसात कराड - चिपळूण रस्त्यावर मारुल तर्फ पाटण गावच्या हद्दीत वाजेगाव येथे नव्याने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात ओढ्याचे पाणी आल्याने या मार्गावरील पर्यायी मार्ग वाहून गेला यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. ओढ्यावर पुलाचे काम सुरू असून पर्यायी बाजूने भर टाकून रस्ता तात्पुरता सुरू करण्यात आला होता. यामुळे धक्का- मणेरी- नेरळे मार्गे लहान वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर असून अशा धोकादायक ठिकाणी लक्ष ठेवून आहे.

काल कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.  रविवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सायंकाळी ५ या  २४ तासात कोयना येथे- १९९ मि.मी पाऊसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे- १६५ मि.मी. आणि महाबळेश्वर येथे- १६० मि.मी. इतकी पाऊसाची नोंद झाली आहे. रविवार पासुन जोर धरलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या झालेल्या पेरण्या या पावसाने वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. चालू वर्षी २१ मे पासूनच पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे देखील खोळंबली आहेत. पावसाच्या अनिश्चिती मुळे पाटण तालुक्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे

        अनेक ठिकाणी या पावसाने ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर पाणी येत आहे. छोटे- मोठे पुल पाण्याखाली जात आहेत. अशा धोकादायक ठिकाणी कोणीही पाण्यात उतरु नये सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.