शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
शिरुर शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात "मनसे" हा शब्द ठळकपणे लिहिला जातो ते फक्त पक्षामुळे नव्हे, तर रमणलाल भंडारीसारख्या कार्यकर्त्यांमुळे! हुडको वसाहतीतून उगम पावलेला हा निष्ठावंत नेता आजही लोकांच्या हृदयात तितकाच प्रभावी आहे जितका तो पक्ष स्थापनेच्या काळात होता.
सन २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिरुरमध्ये पाया रोवणारा आणि पहिल्या शहराध्यक्षपदाचा मान पटकावणारा रमणलाल भंडारी यांनी तेव्हापासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत समाजकार्यासाठी अविरत झगडले. २०१० मध्ये नगरपरिषद निवडणुकीत उतरलेले भंडारी यांनी नुसती उमेदवारी नव्हे, तर मनसेचा संदेश घराघरांत पोहोचवला.
सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत व्यापक आहे. "सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ" व "महाराणा प्रताप मित्र मंडळ" यांच्या अध्यक्षपदावरून त्यांनी युवकांना संघटित केलं, संस्कारक्षम उपक्रम राबवले. नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मतांनी लढा दिला – जिंकले नाही तरी शिरुरकरांच्या मनात जागा नक्की जिंकली.रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी सलग ३ दिवस आंदोलन करत त्यांच्या अडचणी शासन दरबारी पोहोचवल्या. नगरपालिका कामगार युनियनमधील समस्या मार्गी लावणारा आवाज म्हणजे रमणलाल भंडारी – जो फक्त मोर्चे नाही तर मार्गदर्शनही देतो.
भंडारी यांनी २००५ मध्ये मनसेच्या वतीने जनतेच्या हितासाठी तुरुंगवासही पत्करला — आणि ते शिरुरमधील पहिले मनसैनिक ठरले ज्यांनी संघर्षासाठी बंद दरवाजांचे कुलूप उघडलं.ते "भंडारी प्रतिष्ठान" आणि कै. रुखमिणीबाई प्रेमराजजी भंडारी प्रतिष्ठान या दोन संस्थांचे संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी दरवर्षी गरजूंना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप अशा उपक्रमांद्वारे माणुसकीचा सेतू उभा केला आहे.
आज रमणलाल भंडारी हे फक्त एक माजी अध्यक्ष नाहीत, तर शिरुरकरांच्या विश्वासाचे प्रतिक आहेत. ते म्हणतात, "पूर्वी सोशल मिडिया नसतानाही मनसैनिक एकदिलाने लढायचे. आजच्या काळात माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखत, नव्या नेतृत्वाला साथ दिली तर मनसे पुन्हा एकदा शिरुरमध्ये झेंडा रोवेल."
भविष्यात शिरुर शहरात मनसे पक्षाचे पुन्हा बळकटीकरण व्हावे यासाठी त्यांनी पक्षात "जिरवाजिरवी" थांबवून एकसंघतेचा संदेश दिला आहे.





Social Plugin