सातारा - टेंभुर्णी मार्गावर त्रास; कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा- टेंभुर्णी ५४८सी या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. अर्धवट सोडलेल्या कामांमुळे स्थानिक रहिवाशांसह प्रवासी, वाहनचालक आणि भाविक भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्वरित काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले, की पुसेगाव शहरातून सातारा- टेंभुर्णी या महामार्गाचे मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे गेली पाच वर्षे काम चालू आहे. येरळा नदी पूल ते डॉ. सुरेश जाधव यांचे दवाखान्यापर्यंत अंदाजे पाचशे मीटर महामार्गाचे काम रखडलेले आहे, तसेच दहिवडी रस्त्यावरील शिवाप्पा गरज ते येरळा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारांची व महावितरणकडील पथदिव्यांची कामे प्रलंबित आहेत.
पुसेगाव हे शहर प. पू. सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीमुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. शहरामधून सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांना जोडणारा मुख्य चौक असून, पुसेगाव ही उत्तर खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे.
या महामार्गाचे काम ज्या ठिकाणी रखडलेले आहे. तेथे पुसेगावचे जुने गावठाण आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस ५० ते १०० वर्षांची जुनी घरे आहेत. याप्रश्नी शासकीय, प्रशासकीय, एमएसआरडीसी व मेघा इंजिनिअरिंगचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठकी झाल्या आहेत. यामध्ये रस्त्याच्या मोजणीसाठी अधिकाऱ्यांनी आग्रह धरला त्यास मेधा इंजिनिअरिंग कंपनीने १४ लाख रुपये भरून मोजणी मागवलो. या मोजणीमध्ये कोणाचे अतिक्रमण दिसून आले नाही. यावर एक जून २०२५ रोजी ग्रामस्थांची बैठक झाली. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतर घेऊन बाधित लोकांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, असा आग्रह धरला. यासंबंधी सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी यांनी नुकसान भरपाई देऊ, असे सांगितल्याने बाधित लोकांच्या भरपाई संबंधी अशा वाढलेल्या आहेत.
या निवेदनावर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, माजी चेअरमन शामराव जाधव, संजय जाधव, ग्रामस्थ श्रीनिवास मुळे, संजय जाधव, दिलीप बायल, सूरज जाधव, दिलीप जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलनाचा इशारा ग्रामपंबायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शासनाच्या विविध खात्यांकडे नुकसान भरपाई मिळण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. तेव्हा असे लक्षात आले की बाधितांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही. नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय स्थानिक लोक जागा देण्यासाठी तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी पुसेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा- टेंभुर्णी महामार्गाच्या रखडलेल्या कामात लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा. जर हा प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही, तर नाइलाजास्तव ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे काही नुकसान झाल्यास त्यास जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.





Social Plugin