Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव ठाण्यात उत्साहात साजरा ,



मितेश जैन - कल्याण प्रतिनिधि 


ठाणे - पुण्यश्लोक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ठाणे शहरातील अहिल्याबाई होळकर पथावर तसेच मासुदा तलावालगत वसलेल्या त्यांच्या स्मारकस्थळी भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील हे एकमेव स्मारक असून, येथे आजच्या दिवशी नर्मदा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराणी देवी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य चे कोकण विभागीय सचिव व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे मुंबई विभाग संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री प्रमोद वाघमोडे  यांच्या हस्ते महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमास समाजबांधवांची विशेषतः महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती. यापूर्वी आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्या दौड’ या सामाजिक जनजागृती उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन धनगर प्रतिष्ठान, ठाणे यांनी केले होते. याप्रसंगी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ नानासाहेब मोटे, महावितरण चे संचालक केळे साहेब, ठाणे महापालिकेचे विविध पदाधिकारी, धनगर प्रतिष्ठानचे व महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समारोह समिती समारोप समितीचे सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करत, त्यांच्या समाजकार्यास व लोकहितवादी धोरणास उजाळा देत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.