Ticker

6/recent/ticker-posts

गेल कंपनी परिसरात जमावबंदी पाचपेक्षा अधिक जणांना फिरण्यास मनाई



 अलिबाग (रत्नाकर पाटील)

गेल कंपनीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये स्थानिकांसह प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्यावतीने गुरुवार पासून (दि.26) कामबंद आंदोलन सूरू आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आता प्रशासनाने जमावबंदी लागू केली असल्याची चर्चा आहे. कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर पाचपेक्षा अधिक जणांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात असून, अनेकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सूरू केली आहे.

शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमीनी दिल्या. त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रकल्पग्रस्त, स्थानिकांना प्राधान्याने नोकरी कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे. ही भुमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी हा लढा सुरु केला आहे. निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सूरू झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा चार दिवसांमध्ये 90 कोटीहून अधिक फटका कंपनीला बसला. अखेर प्रशासनाने हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीसांची मदत घेतली असल्याची चर्चा सध्या गावागावात सूरू आहे. कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर ठिकठिकाणी पोलीसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा सुरू केला आहे. गेल कंपनीत कामाकरीता येणारे व जाणाऱ्या कामगारांना, वाहन चालकांना कामावर जाण्यास परावृत्त करण्याच्या हेतून दमदाटी करीत रागाने बघणे, धमकी दर्शक हातवारे करणे, आरडाओरड करणे असे असभ्य वर्तन करून सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करून कामगारांना भयभीत करून त्यांना कामावर जाण्यास अडवणूक करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सूरू केली आहे. तसेच त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत आहेत