Ticker

6/recent/ticker-posts

करंजी ते मुठ्ठा रस्त्यावर खड्डे; अपघाताची शक्यता.



मालेगाव  प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

    मालेगाव : तालुक्यातील करंजी पासून ते मुठ्ठा या गावांच्या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. 

    या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. मालेगाव तालुक्यातून रिठदकडे जाण्यासाठी करंजी, शेलगाव बोंदाडे, मुठ्ठा, दापुरी कालवे, ताकतोडा, सोमठाणा, शिरसाळा आणि रिठद असा मधला आणि जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वरील सर्व गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. मात्र, या रस्त्याची फार दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र, गावकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या रस्त्याची काहीवेळा डागडुजी करण्यात आली. मात्र यामध्ये निकृष्ट दजाचें साहित्य वापरल्याने काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी एखादा रुग्ण आणायचा असल्यास मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित विभागाने या गावातील नागरिकांची रस्त्यांची समस्या समजून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी या रस्त्यावरील गावातील नागरिक करित आहेत.