Ticker

6/recent/ticker-posts

शिरुर बसस्थानकावर फुलांनी सजलेली एस.टी., ७७ वा वर्धापन दिन थाटात साजरा!



शिरुर ग्रामीण प्रतिनीधी – (शैलेश जाधव)

 गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, रांगोळ्यांची पायघड, सनईचे मंगल सूर, आणि फुलांनी सजवलेल्या एस.टी. बस... असा मंत्रमुग्ध करणारा सोहळा शिरुर बसस्थानकावर पाहायला मिळाला. निमित्त होते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे!१ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर दरम्यान धावलेली पहिली एस.टी. बस शिरुर येथे थांबली होती. या ऐतिहासिक क्षणाची आठवण जपत यंदा शिरुर आगारात वर्धापन दिन खास पद्धतीने साजरा करण्यात आला.

या वेळी शिरुर-कुर्ला (नेहरूनगर) मार्गावरील बसांना फुलांनी सजवण्यात आले होते. रंगीबेरंगी रांगोळीने सजलेले बसस्थानक पाहून प्रवासीही भारावून गेले. बस पूजनाचा मान ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर व आगार व्यवस्थापिका मनिषा गायकवाड यांना देण्यात आला.

कार्यक्रमात शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे, बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.बस पूजनानंतर वर्धापन दिनाचा केक कापून प्रवाशांना केक आणि पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले.

यावेळी आगार प्रमुख मनिषा गायकवाड यांनी एस.टी.च्या सेवांचा आढावा घेत ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टी.चे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले.प्रा. सतीश धुमाळ यांनी बोलताना एस.टी.च्या फेऱ्या वाढवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन माधव मुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केले.