पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
बोईसर : मौजे बोईसर, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. १७६/१ (जुना सर्व्हे नं. १२२/अ १-१-१ अ १ अ पैकी) ही जमीन शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी शासकीय सूचना फलक लावण्यात आला आहे.
या फलकावर “ही जमीन शासनाच्या मालकीची असून या जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
चौकशी अधिकारी तथा मंडळ अधिकारी बोईसर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक
सदर शासकीय जमिनीवर सूचना फलक लावण्याची कार्यवाही चौकशी अधिकारी तथा मंडळ अधिकारी, बोईसर विजय गुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फलक लावताना ग्रामविकास अधिकारी विनायक जनाठे तसेच बोईसरचे कोतवाल बिपीन पाटील हे उपस्थित होते.
प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे सदर जमीन शासकीय मालकीची असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला असून, या जागेवर कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
अतिक्रमण झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
बोईसर परिसरात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होण्याच्या घटना वेळोवेळी समोर येत असताना, प्रशासनाने संबंधित जागेवर थेट सूचना फलक लावल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे ताबा घेणे, बांधकाम करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा वापर करणे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, केवळ सूचना फलक लावण्यापुरती कार्यवाही मर्यादित न ठेवता, या शासकीय जमिनीची नियमित पाहणी करून भविष्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शासकीय जमिनीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे पुढील काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रत्यक्ष कारवाईला वेग येतो का, याकडे आता बोईसरवासीयांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin