*लाखोंच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक;मनोज जरांगे पाटलांचा एल्गार*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
दि.२९ जून २०२५ रोजी आंतरवाली सराटी(ता.अंबड, जि.जालना) येथे मराठा समाजाच्या नियोजनासाठी एक भव्य व ऐतिहासिक राज्यव्यापी बैठक पार पडली लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा बांधवांनी ही सभा मराठा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन ठरवली.या बैठकीतून समाजाने आगामी मुंबई आंदोलनासाठी रणनिती ठरवली असून,आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा समर्थपणे सांभाळली.
*बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व संदेश*
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून मराठा समाजाच्या लढ्याची दिशा स्पष्ट केली.
"इतके दिवस आंदोलन चालू असतानाही मराठा समाज मागे हटलेला नाही.ही चिकाटीच आपल्या विजयाचे कारण ठरणार आहे,"असे ते म्हणाले.
"व्हाट्सॲप,फेसबुकवर पाठिंबा देण्याची वेळ संपली आहे.आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे."
"२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवाली सराटीहून निघून,२९ ऑगस्ट रोजी कोट्यवधी मराठ्यांसह मुंबईत दाखल होणार आहोत."
"राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी झटतात,पण समाजासाठी कोणी उभं राहत नाही.आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल."
"मुंबईत शांततेने जाणार आहोत.पण जर एका मराठा बांधवाला जरी काठी लागली,तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पडेल,हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे."
"पावसाची शक्यता लक्षात घेता सर्वांनी तयारीनिशी मुंबईकडे निघा.गावागावातून वर्गणी गोळा करून पेट्रोल,छत्र्या,अन्नाची व्यवस्था करा."
आमदार व खासदार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे थेट संपर्क
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की,त्यांनी स्वतः२८८ आमदारांपैकी २८५ आमदारांना फोन करून मुंबई आंदोलनाबाबत माहिती दिली व सरकारकडे मागण्यांची पूर्तता करण्याचा आग्रह केला."पहिल्यांदाच मी देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला असून,२८ ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे.त्या नंतर मी आंतरवली सोडली,की मागे वळून पाहणार नाही,"असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
*प्रमुख मागण्या*
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर तात्काळ काढावा
न्या.शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ द्यावी
आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी
कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी प्रक्रियेत सुलभता आणावी
हैद्राबाद,मुंबई,सातारा,औंध गॅझेट लागू करावेत
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी
मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत
स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी
कोपर्डी पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा
ही बैठक केवळ नियोजन नव्हे,तर संपूर्ण मराठा समाजाच्या मनातील रोष,आत्मविश्वास आणि निर्णायकतेचे प्रतिबिंब ठरली.उपस्थित लाखो मराठा बांधवांच्या घोषणा देत मनोज जरांगे पाटलांच्या भाषणातून एकच संदेश होता.आरक्षण व प्रमुख मागण्या मान्य होई पर्यंत आता माघार नाही....
Social Plugin