Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस पाटील गणेश चौधरी यांच्यावर अंधारामध्ये शस्त्रहल्ला



आरोपीना त्वरित अटक करावी अन्यथा मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा

ग्रामीण प्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव : 

शहापुर तालुक्यातील खर्डी विभागातील वरस्कोळ गावचे पोलिस पाटील गणेश चौधरी यांच्या घराजवळील रस्त्यावर दोन तरुण चारचाकी वाहन शिकत असतांना ते वाहन भरधाव वेगाने चालवुन रस्त्यालगत असलेल्या छोट्या मुलीला घाबरवत असल्याने गणेश चौधरी यांनी त्यांना हटकले असता मोहन हळकुंडे व योगेश वाजे यांनी मनात राग धरून १० जून ला रात्री १० च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन धारदार शस्त्राने गणेश चौधरी यांच्या मानेच्या मागच्या बाजूला वार केले. त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गावकरी रविंद्र चौधरी व दशरथ चौधरी यांनी गणेशला तत्काळ खर्डी रुग्णालयात दाखल केले. परंतु, गणेश यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत 

याप्रकरणातील संशयित आरोपी योगेश व मोहन यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला आहे. याप्रकरणी त्यांचे वडील दशरथ चौधरी यांनी खडीं पोलिस दुरक्षेत्रात तक्रार दाखल केली असून, पोलिस उपनिरीक्षक सुरेश बाविस्कर पुढील तपास करीत आहेत. आरोपींच्या तपासासाठी तीन टीम बनवण्यात आल्या असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, अशी माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा खर्डी परिसरात होत असून, पोलिस पाटलावर झालेल्या ह्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पोलीस पाटील गणेश चौधरी यांचे प्रकृती चिंताजनक असून या हल्ल्यात दोन हल्लेखोर होते त्यापैकी एक अल्पवयीन हल्लेखोर पकडलेला असून मुख्य आरोपी अद्यापही अटक झालेला नाही सदर आरोपींना त्वरित अटक करा अन्यथा मराठा समाज आंदोलन करेल असा इशारा मराठा समाज मंडळानी दिला असून पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे येत्या दोन दिवसांत आरोपीला अटक केली जाईल असे त्यांनी आश्वासन पोलिसांनी दिले.