Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावचे सरपंच अपात्र, आमदार महेश शिंदे गटाला धक्का



बुथ  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम शंकर मसणे यांना सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अपात्र ठरवले आहे. सदस्यत्व रद्द ठरविण्यात आल्याने श्री. मसणे यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, पुसेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील एकमेव जागेवर निवडून आलेले आमदार शशिकांत शिंदे गटाचे श्री विजय मसणे अपात्र झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी जातीने लक्ष घातल्याने घनश्याम मसणे यांची सरपंचपदावर वर्णी लागली होती. 

घनश्याम मसणे यांचे पुसेगाव हद्दीतील सिटी सर्वे मिळकत क्रमांक ८२९च्या शासकीय जागेत अतिक्रमण असल्याचे उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिलेल्या अहवालात निदर्शनास आले आहे. त्यामुळे श्री. मसणे यांनी शासनाच्या जागेत बांधकाम करत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे.याबाबत ऍड. रोहित राहुल कांबळे यांनी घनश्याम मसणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. तो ग्राह्य मानून जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. मसणे यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३) व कलम १६ अन्वये अपात्र ठरवले आहे.

पूर्वीचे सरपंच देखील शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने अपात्र झाले होते. ती तक्रार घनश्याम मसणे यांच्या पत्नीने दिली होती. परंतू घनश्याम यांचे देखील शासकीय जागेत अतिक्रमण होते. हे उमेदवारासह स्थानिक नेत्यांना माहीत होती. तरी त्यांनी निवडणूक लढवली. ही बाब निंदनीय आहे.-ऍड. रोहित कांबळे, पुसेगाव