Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार - इम्तियाज जलील



*कारंजामध्ये एआयएमआयएम चा जलसा-ए-आम उत्साहात संपन्न!


 गुणवंत राठोड कारंजा (लाड) प्रतिनिधी 

आम्ही लवकरच पक्ष सदस्यचा मोहिम राबवणार असून फक्त नगर पालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती एआयएमआयएम चे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा येथे आयोजित जलसा-ए-आम या कार्यक्रमात दिली.  

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार, प्रसार आणि संघटनात्मक दुवे निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ने २४ जून रोजी प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे जनसंवाद दौरा आयोजित केला होता. दरम्यान, कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्समधील दारुस सलाम येथे जलसा-ए-आमचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारूखभाई शाब्दी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी, सरचिटणीस समीर साजिद बिल्डर, सरचिटणीस अतिक अहमद खान, सचिव सैफ पठाण, सहसचिव शफिउल्लाह काझी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले की, कितीही खोटे गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही, थांबणार नाही. सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटे आरोप लाऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला,वाशिम यवतमाळ, अमरावती या चार जिल्ह्याची धुरा प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी सोपवून अन्य समविचारी पक्षा सोबत युती व आघाडी करण्याची सूचना करण्याचा तसेच उमेदवारी वाटप करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याची माहिती दिली. दरम्यान उपस्थितांना पक्षाच्या विचारधारे बाबत सविस्तर माहिती देऊन पक्षाला बळकट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार ॲड. फिरोज शेकुवाले यांनी मानले .