*‘सुखापुरी फाटा’व‘सिव्हिल हॉस्पिटल जालना’ येथे एस.टी.बस थांबे मंजूर!*
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जालना शाखेच्या पाठपुराव्याला यश मिळत जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.एस.टी.महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसना आता ‘सुखापुरी फाटा’ व ‘सिव्हिल हॉस्पिटल (घाटी) जालना’ येथे अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे.विभाग नियंत्रक (एस.टी.)जालना यांनी हा निर्णय घेत आगार प्रमुखांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सुखापुरी फाटा हे २५-३० खेड्यांच्या दळणवळणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. आठवडी बाजार,शैक्षणिक गरजा व वैद्यकीय कारणास्तव मोठ्या प्रमाणावर नागरिक अंबड व जालना येथे प्रवास करतात.या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतच्या पुढाकाराने व सुखापुरी व वसंतनगर ग्रामपंचायतींच्या ठरावांच्या आधारे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.जिल्हा रुग्णालय परिसरात एस.टी.बस थांबवण्यात आल्यास रुग्ण, वृद्ध आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना फार मोठा लाभ होणार आहे.ग्राहक पंचायतच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यालाही बस थांबा मंजूर करण्यात आला आहे.
विभाग नियंत्रकांनी अंबड,जालना,परतूर आणि जाफराबाद येथील आगार व्यवस्थापकांना लेखी आदेश देत या ठिकाणी बसेस थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच दोन्ही थांबे ई-टीआय/ओआरएस प्रणालीत समाविष्ट केल्यामुळे तिकिट बुकिंगही शक्य होणार आहे.चालक-वाहक यांना या थांब्यांची माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना,रुग्णांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.हा निर्णय अखिल भारतीय ग्राहक पंचायत–जालना शाखेच्या लोकाभिमुख व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित ठरले आहे...
Social Plugin