Ticker

6/recent/ticker-posts

आरसीएफ शाळेचा सावळा गोंधळ सुरूच



 अपूर्ण हस्तांतरण प्रक्रीया मुळे १७००विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात

अलिबाग-(रत्नाकर पाटील)

आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे सतराशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत येण्याची चिन्ह दिसत आहे. आरसीएफ प्रशासनाकडून शाळेसाठी नवीन शैक्षणिक संस्थेच्या निवड केली असली तरी जुन्या शैक्षणिक संस्थेनी हस्तांतरण प्रक्रीया पूर्ण केली नसल्याने, गोंधळाची स्थिती कायम आहे.

पुणेच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे आरसीएफ वसाहतीमध्ये शाळा चालवण्यात येत होती. यासाठी आरसीएफ प्रशासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यात एक करार करण्यात आला होता. १९८१ ते २०११ पर्यंत हा करार अस्तित्वात होता. नंतर दर पाच वर्षांसाठी कराराचे नुतनीकरण करण्यात येत होते. त्यामुळे शाळा नियमित सुरू होती.

मात्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरसीएफ सोबत कराराचे नुतनीकरण करण्यास डेक्कन एज्यूकेशन सोसायटीने नकार दिला. त्यामुळे शाळेचे भवितव्य अडचणीत आले. हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने  नविन शैक्षणिक संस्थेची नेमणूक होत नाही तोवर डेक्कन एज्यूकेशन सोसायटी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. आता आरसीएफ प्रशासनाने डिएव्ही कॉलेज मॅनिजिंक कमिटी नवी दिल्ली या संस्थेची निवड केली. मात्र डेक्कन एज्यूकेशन सोसायटीकडून हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचा घोळ सुरुच राहिला आहे.

त्यामुळे १६ जुन पासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी आरसीएफची शाळा सुरू होऊ शकलेली नाही. शाळा व्यवस्थापनाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्याबाबतही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे.