७ महिन्यापासून खड्ड्यातून करावा लागतोय प्रवास कलगाव ग्रा.पं. चे समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस तालुक्यातील कलगाव ग्रामपंचायतला भारती एअरटेल लिमिटेडची ऑप्टिकल फायबर केबलची लाईन टाकण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने दुरुस्तीसाठी कंपनीने ओ. एफ. सी. खोदकाम शुल्क म्हणून ४ लाख २५ हजार रुपये दिले. ग्रामपंचायतकडे ही रक्कम असूनही नागरीकांना खड्ड्यातून जाण्याचा ञास सहन करावा लागत आहे.
दिग्रस तालुक्यातील कलगावात ग्रामपंचायत हद्दीतून भारती एअरटेल लिमिटेडची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम रीतसर ग्रामपंचायतची परवानगी घेवून २०२५ च्या जानेवारी महिन्यात करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतून ६५० मीटर ओ. एफ. सी. टाकण्याकरिता रस्त्या लगतच्या मातीपृष्ठ भागाचे व रस्त्या लगतच्या खडीकरण भागाचे तसेच डांबरीपृष्ठ भागाचे व सिमेंट काँक्रेट रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी शुल्क भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यात येवून ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात येवून कलगावचे रस्ते फोडण्यात आले. पण आज घडीला सात महिन्याचा कालावधी उलटूनही कलगाव ग्रामपंचायत सदर रस्ते दुरुस्ती कामास टाळाटाळ करीत आहे.
सदर रस्ते कधी दुरुस्ती करणार असा सवाल केला असता ' काय घाई आहे, तुम्ही विचारणारे कोण' असे नागरिकांना ग्रामपंचायतीत पद नसणाऱ्या स्वयंघोषीत पुढाऱ्याकडून ऐकावयास मिळत आहे. सर्वांना माहित आहे सध्या पावसाळा चालू आहे. खोदकाम करीत असतांना अनेक ठिकाणी गज कटल्या गेली आहेत तर काही ठिकाणी गज उघड्यावर पडली आहेत. सदर रस्ता गावचा मुख्य रस्ता असल्यामुळे वर्दळ बऱ्यापैकी असते, पण ग्रामपंचायत सदर बाबी विषयी गांभीर्याने कार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात एखादी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण ? सदर खोदकाम करत असतांना दोन ठिकाणी मुख्य रस्ता आडवा फोडण्यात आला. त्या ठिकाणी आजपावेतो डागडुजी न करण्यात आल्यामुळे वाहन चालवीत असतांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्याने डेहणी, आडगाव, वडगाव, माळहिवराचे नागरीकांसह शाळकरी विद्यार्थी सुद्धा ये- जा करतात. पण तरीही ग्रामपंचायत सदर कार्य हाती घेत नाही ह्याला काय म्हणावे अशी स्थिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर कामाची डील साडे पाच लाखात ग्रामपंचायत व भारती एअरटेल च्या दरम्यान झाली असून शुल्क भरणा ४ लाख २५ हजार रुपयाचाच ऑनलाईन दाखविण्यात आला तर उर्वरित रक्कम हितसंबंधितामध्ये वाटून घेण्यात आली अशी नागरीकात चर्चा सुरू आहे.
सद्या स्थितीत कलगाव ग्रामपंचायत रस्ते दुरुस्ती कार्य करण्यास जो विलंब लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेत कुजबुज एकवयास मिळत आहे की सदर निधीची विल्हेवाट तर लावल्या गेली नसेल अशी शंका जनमानसांत निर्माण होत आहे.
Social Plugin