Ticker

6/recent/ticker-posts

कुडासे खुर्द अंगणवाडी केंद्रात मद्यपी कडून तोडफोड व धिंगाणा ; ग्रामस्थांत संताप



प्रतिनिधी : प्रमोद गवस, दोडामार्ग

दोडामार्ग, १८: कुडासे खुर्द (ता. दोडामार्ग) येथील पाल पुनर्वसन शाळेच्या आवारातील अंगणवाडी केंद्रात अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत घुसून तोडफोड केली व लघु शंकेसारखं असभ्य कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. यामुळे ग्रामस्थ, पालक व शाळा प्रशासनामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटखाची पाकिटे आदी साहित्य आढळले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षक व अंगणवाडी सेविकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सरपंच श्रद्धा नाईक, उपसरपंच राजेंद्र गवस, ग्रामस्थ पांडुरंग गवस तसेच शिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडून तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष घालावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

"शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. येथे अशा घृणास्पद प्रकारांची पुनरावृत्ती होणे अत्यंत निंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो," अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासनाने एकमुखाने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.