Ticker

6/recent/ticker-posts

खळबळजनक! अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचार


 

अलिबाग पोलीस ठाण्यात एका दिवसांत दोन गुन्हे दाखल


 अलिबाग (रत्नाकर पाटील)

अल्पवयीन मुलीसह एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना अलिबाग व परिसरात घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात एका दिवसांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यात आले आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील चोंढी परिसरातील मुशेत येथील अलास्का व्हीलामधील सभागृहात एका कंपनीच्यावतीने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कंपनीतील एक कर्मचारी दारु भरपूर प्यायला. मंगळवारी (दि.1) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने त्या ठिकाणी असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी अभिषेक सावडेकर (रा. नवी मुंबई) याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.2) सायंकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आणखी किती जणांचा समावेश असणार याकडे पोलीस तपासून निष्पन्न होणार आहे.

तसेच खालापूरमधील 18 वर्षीय तरुणाने अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील एका अल्पवयीन मुलीसोबत आठ महिन्यापूर्वी फेसबुक या सोशल मिडीयावर ओळख केली. तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिची इच्छा नसताना तिच्यासोबत अलिबाग समुद्रकिनाऱ्यासह ठिकठिकाणी शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे ती चार महिन्याची गरोदर राहिली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात आले असून, त्याचे वय 18 वर्षे आहे. एका दिवसामध्ये महिला अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल काय पावले उचलणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.