नाशिक प्रतिनिधि अमन शेख ,
सिटीलिंक बसचालकांच्या मग्रुरीसह बेशिस्तीमुळे शहरात दिवसाआड एक ते दोन गंभीर व किरकोळ स्वरुपाचे अपघात घडत आहेत. त्यामुळे नाशिककरांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असून बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे भर वाहतूक कोंडीतही शनिवारी सकाळी एक विचित्र अपघात घडला. त्यात मित्राला बुलेटवरून नाशिकरोड येथे सोडवण्यास निघालेल्या तिघांच्या दुचाकीस सिटीलिंकने जोरदर धडक दिल्याने ते जबर जखमी झाले. मुंबईनाका पोलिसांनी सिटीलिंक बसचालकाची चौकशी सुरू करून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली
विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा फटका नाशिकच्या वाहतुकीला बसतो आहे. त्यातच शनिवारी सकाळी गडकरी चौकातील डीसीपी कार्यालयासमोरील एकेरी रस्त्यावर सिटीलिंक बसने केलेल्या अपघातानंतर नाशिककरांनी सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा दाखला देत त्यांच्यावर आगपाखड केली. या अपघातात मयूर संजय मांडवडे (२४), चेतन अंबादास मगर व शुभम संजय महाले (२५, रा. सोमेश्वर कॉलनी, सातपूर, नाशिक) हे तिघे मित्र जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आदिवासी बांधव आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडोंच्या संख्येने बिऱ्हाड मोर्चा काढून नाशिकच्या गडकरी चौकातील आदिवासी विकास आयुक्तालयाबाहेर जमले आहेत. मागण्यांसह इतर शासकीय सोपस्काराचे खल सुरू असल्याने मोर्चेकरी गडकरी चौक ते सीबीएसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. मात्र, ती वळवताना मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयासमोरील एकेरी रस्त्यावरूनच गडकरी चौक ते सीबीएस आणि सीबीएस ते गडकरी चौक या मार्गावरील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गेल्या ९ जुलैपासून वाहतूककोंडी होत आहे.
अशातच चेतन मगर याच्यासह मयूर व शुभम हे तिघे बुलेटवरून शनिवारी सकाळी सात वाजता त्र्यंबकनाक्याकडून गडकरी चौक सिग्नलमार्गे नाशिकरोडला जात होते. शुभमला बाहेरगावी जायचे असल्याने त्याला सोडवण्यासाठी निघाले असतानाच डीसीपी ऑफिससमोरून सिटीलिंकची बसही मुंबईनाकामार्गे भरधाव वेगात आली. यानंतर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात चेतनच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. तर मयूर आणि शुभम यांनाही मार लागल्याने ते जखमी झाले. नागरिकांनी तिघांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मुंबईनाका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
सिटीलिंकच्या अपघातांचा इतिहास
१० जुलै २०२४ रोजी नाशिकरोडच्या मालधक्का रोडवरील मनपा सिटीलिंक बस डेपोमध्ये सानवी सागर गवई (५) हिला सिटीलिंक बसने पाठीमागून धडक दिल्याने ती ठार झाली.
१३ सप्टेंबर २०२२ रोजी एमएच १५ जीव्ही ८०७१ या बसने नितेश वानखेडे याला धडक दिल्याने तो जखमी झाला.
७ ऑगस्ट २०२२ रोजी एमएच १५ जीव्ही ७९६८ च्या धडकेत अनोळखी पादचारी ठार
७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिटीलिंक बसमधून उतरताना विजय गुलाबराव बोरसे (३२) यांचा माडसांगवी टोलनाका येथे मृत्यू.
९ एप्रिल २०२२ रोजी सिडकोतील दिव्या अॅडलॅब्जजवळ निंबा उखा ह्याळीज (७०) यांचा बसच्या धडकेत मृत्यू
६ मे २०२२ रोजी सिटीलिंक (एमएच १५ जीव्ही ८००६) धडकेने पंडित भागूजी झोले (४९) यांचा मृत्यू
तुळसाबाई हिंमतराव सोनवणे (७०) यांचा भवर टॉवरजवळ बसच्या धडकेने मृत्यू,
जानेवारी २०२४ मध्ये सातपूर एमआयडीसीत सिटीलिंकने (एमएच १५ जीव्ही ७६९८) दुचाकीस्वार शिवाजी विश्वनाथ झोटे यांना चिरडले त्यांचा जागीच मृत्यू
१५ मे २०२५ रोजी सिटीलिंक बस के. के. वाघ कॉलेजजवळीस दुभाजकावर जाऊन आदळली
अशी झाली आहे धोकेदायक सिटीलिंक
आतापर्यंत सिटीलिंकच्या अपघातात सात जणांचा मृत्यू
तीन वर्षांत ३२ हून अधिक अपघात
४० हून अधिक जखमी
ताफ्यात एकूण २५० बसेस
अप्रशिक्षित चालकांच्या हाती स्टेअरिंग
रेसर बाईकसारखी चालवतात बस
अनेक बसेसच्या लाईट, ब्रेक लाईट, अप्पर, डिप्पर बंद
बसचालकांत रिक्षाचालकांचाच भरणा जास्त
चालक फिट की अनफिट ठखण्याची यंत्रणा नाही.
Social Plugin