Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यातील फार्म लेडी सौ. भाग्यश्री गायकवाड



  प्रतिनिधी --संजय भरदुक मंगरुळपीर 

मंगरूळपीर ---भारताच्या ग्रामीण शेती विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून उदयास आलेल्या वाशिम जिल्ह्यातील फार्म लेडी सौ. भाग्यश्री रवींद्र गायकवाड रा.गायवळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांनी स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. केवळ व्यक्तिगत यशापुरते मर्यादित न राहता, त्यांनी समाजामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गांडूळ खत निर्मिती, नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्र, कुक्कुटपालन ,देशी गोपालन,बायोगॅस निर्मिती पोषणतत्त्वांचे महत्त्व, महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर जनजागृती घडवून आणली आहे.

*सौ .भाग्यश्री गायकवाड यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत दैनिक महाराष्ट्र ग्रामीण न्युज या प्रसिद्ध दैनिकाने त्यांची यशोगाथा डॉक्युमेंटरी स्वरूपात चित्रित करून संपूर्ण भारतात प्रसारित केली आहे. या माध्यमातून भारतभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी त्या एक प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.

सौ भाग्यश्री गायकवाड यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले की, “कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथील शास्त्रज्ञांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, शेतशाळा, महिला बचत गट प्रशिक्षण, समन्वय कार्यक्रम, नैसर्गिक शेतीबाबतचे तांत्रिक सल्ले व मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्या मुळेच हे परिवर्तन शक्य झाले आहे.” त्यांनी समेकित शेती पद्धती, जैविक निविष्ठा निर्मिती, शेतीपूरक उद्योगांचे महत्त्व अशा बाबतीत आपले ज्ञान वाढवले आणि ते प्रत्यक्षात उतरवले.

या यशामागे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष मा. आनंदरावजी देशमुख भाऊसाहेब यांचे प्रेरणादायी नेतृत्व देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून व धोरणात्मक मार्गदर्शनातून केंद्रातील शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून विज्ञानाधिष्ठित शेती पद्धती रुजवण्यासाठी सतत प्रेरणा मिळत असते. याचे फलित म्हणून सौ भाग्यश्री गायकवाड यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरत आहे.

ही यशोगाथा केवळ एका महिलेला केंद्रस्थानी ठेवून सांगितलेली कथा नाही, तर ती आहे शाश्वत शेती, महिला सबलीकरण, आणि विज्ञानाच्या आधारे ग्रामीण जीवनात घडवलेले सकारात्मक परिवर्तन यांची ठळक उदाहरण.अशा कार्यकर्त्या महिलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून, हेच “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” या घोषवाक्याचे खरे प्रतिबिंब आहे.