Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी येणे अपेक्षितच अरुण नलावडे; पुसेगावातील श्री सेवागिरी व्याख्यानमालेत गुंफले सहावे पुष्प




बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]  

महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली गेलीच पाहिजे. जे जे राहात असतील, त्यांना मोडकी तोडकी का होईना; पण मराठी आलीच पाहिजे. मराठी भाषा बोलली जावी, यासाठी आंदोलने करावी लागतात. भाषेवरून भांडणाची वेळ आज आपल्यावर आली आहे, याची लाज वाटते, असे परखड मत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केले.पुसेगाव येथे प. पू. श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित 'श्री सेवागिरी व्याख्यानमालेत', 'प्रकट मुलाखती'च्या माध्यमातून सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. मुलाखतकार अजित चव्हाण यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना श्री. नलावडे यांनी श्रोत्यांसमोर त्यांचा जीवनपट उलगडला.

याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने आदी मान्यवरांसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. नलावडे म्हणाले, "आजचा हिंदी सिनेमा खोटा आहे. याउलट चांगल्या कथानकांमुळे मराठी सिनेमा खरा वाटतो. आज सिनेमा तयार करताना कथेला महत्त्व न देता तंत्रज्ञानाला महत्त्व दिलं जात आहे. खरंतर कथा आवडली की लोकांना सिनेमा आवडतो. त्यामुळे काही दिग्दर्शकांकडून चांगली कथानक असलेली जुनी मराठी नाटकं पुनरुज्जीवित करण्याचं काम सध्या सुरू आहे."

चांगला परफॉर्मन्स करतात म्हणून मराठी कलावंतांना हिंदी चित्रपट सृष्टीतले लोक खूप घाबरतात. तरीदेखील हिंदीत मराठी कलाकारांचा सन्मान केला जात नाही. त्यांना तिथे घर गड्यांचीच कामे दिली जातात. काहीजण मान सन्मान सोडून ही कामे आवडीने करतात, ही दुर्दैवाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.  सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.