Ticker

6/recent/ticker-posts

दुधगांव परिसरात बिबट्याचा वावर



दुधगाव:-  वार्ताहर निखिल नलवडे-

 परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे रेस्क्यू पथक दुधगाव येथे येऊन ग्रामस्थांची समस्या जाणून गेले.

       याच संदर्भात गावातील नागरिक सांगली वनविभाग कार्यालयात जाऊन तेथे विभागीय अधिकारी गवते साहेब यांना ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडत बिबट्यामुळे शेतात काम करणे, जनावरांना चारणे व शेतातील वस्ती असलेल्याचे नागरिक बाहेर जाणे अवघड झाल्याचे सांगितले.

निवेदन स्वीकारल्यानंतर गवते साहेबांनी वनविभागाचे नियम व कायदे यांची सविस्तर माहिती दिली. कायद्याने बिबट्याला थेट पकडण्याचा अधिकार वनविभागाला नाही. फक्त मानवी जीवावर हल्ला झाल्यासच बिबट्याला पकडण्याची कारवाई करता येते. हल्ला लहान असो वा मोठा, तेव्हाच पकडण्याची परवानगी मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.


                                            शेतकऱ्यांची प्रतिक्रिया :

शेतकरी प्रशांत वाडकर यांनी सांगितले की, “बिबट्यामुळे आम्हाला शेतात एकटे जाण्याची भीती वाटते. जनावरं बांधून ठेवली तरी ती सुरक्षित नाहीत. आमचं दैनंदिन जीवन धोक्यात आलं आहे, मुलांना शाळेत सोडणे हेसुद्धा धोकादायक झाले आहे.परवाच आष्टा–इस्लामपूर रस्त्यावर दोनचाकी वाहनाला बिबट्याने धडक दिली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे आता नागरिकांचे जीव गेल्यावरच डोळे उघडणार का?”

शेतकरी सुधीर आडमुठे म्हणाले, “शेतमालाचे रक्षण करणे, जनावरं सांभाळणे अवघड झाले आहे प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी.”

 बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांत वाढती भीती, तर वनविभागाच्या नियमामुळे अडचणीत ग्रामस्थ अशी परिस्थिती दुधगाव परिसरात निर्माण झाली आहे