Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान विद्यालय, निढळ येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे  ] 

हनुमान विद्यालय, निढळ ता. खटाव येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी प्रवेशोत्सव तसेच रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी पुनर्निवड झाल्याबद्दल  श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य . ॲड. श्री. किसनराव खामकर  होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन  श्री. चंद्रकांत दळवी साहेब उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. जगदीश निर्मळ सर यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा आढावा घेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षणविकासासाठी मा. चंद्रकांत दळवी साहेब यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. शाळेच्या तसेच स्कूल कमिटी सदस्य श्री. प्रशांत घाडगे यांच्या सौजन्याने सर्व नवागत विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल व शार्पनरचे वाटप करण्यात आले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी पुनर्निवड झाल्याबद्दल मा. श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांचा हनुमान विद्यालय निढळ व विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मा. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या नेतृत्वगुणांचा, शैक्षणिक दृष्टीकोनाचा व विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शैक्षणिक संस्थांना बळकटी मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. मेघा गायकवाड ,कु. स्वरा भोसले हिने अतिशय गोड व प्रभावी शब्दांत मनोगत व्यक्त केले. 

ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिक श्री. विष्णू पवार यांनी तर कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगावचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी आपल्या मनोगतात मा. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, दळवी साहेबांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी व देणग्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक व भौतिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून संस्थेचा अक्षरशः कायापालट झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यात साहेबांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात मा. ॲड. श्री. किसनराव खामकर साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी मा. चंद्रकांत दळवी साहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध झाली असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांनी शिक्षण, संस्कार आणि कष्ट यांच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.