Ticker

6/recent/ticker-posts

शिरूरचे अभिमान – पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना नक्षलविरोधी सेवेसाठी गौरव"



शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)

भारत सरकारने पत्र क्र. II १८०१५ /६८/२०१४- LWE-III, दिनांक १९ जून २०२१ अन्वये गडचिरोली व गोंदिया हे नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून घोषित केले आहे. या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्र. पीएमडी १२९०/२२४४/प्र.क्र.९१/पोल-१, दिनांक २२ जुलै १९९२ नुसार विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती.

या पथकांमध्ये कार्यरत राहून, धोका पत्करून आणि प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांनी विहीत सेवा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांच्या धाडस, चिकाटी आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

या यादीत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि पोलीस उपनिरीक्षक नकाते यांचा समावेश असून, त्यांच्या नक्षलग्रस्त भागातील सेवेला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे. हे पदक त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि धैर्याचे प्रतीक आहे.हा आदेश महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (मुंबई) यांच्या स्वाक्षरीने १२ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृतपणे जारी करण्यात आला.