Ticker

6/recent/ticker-posts

बिलोली परिसरातील बर्‍याच गावांत नदीच्या पाण्याचा वेढा



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

आदमपूर:बिलोली तालुका तसेच सबंध नांदेड परिसरात गुरुवार दि.२८ ऑगस्ट रोजी राञी व दिवसभरापासून झडीचा संततधार पाऊस कोसळत असल्याने आणि लेंडी, मन्याड,मांजरा व संबंधित गाव परिसरातील नाल्यांना पाऊस व पाण्याच्या विसर्गाने पूर आल्याने बिलोली तालुक्यातील अनेक गावांत पाण्याचा शिरकाव झाल्याचे चिञ गुरुवारी दिवसभर समाज माध्यमाद्वारे जनमानसात पसरले होते.

बुधवार दि.२७ ऑगस्ट रोजी दिवसभर भुरभुरता पाऊस आणि सायंकाळी,राञी बाप्पांचे आगमन होताना पाऊस सुरू झालेला होता.तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरातील निजामसागर धरणाचे काही दरवाजे खुले करण्यात आल्याची वार्ता पसरली.मग देगलूर तालुक्यातील लेंडी धरण व कंधार तालुक्यातील बारूळ-निम्न,उर्ध्व मानार, लिंबोटी धरण प्रकल्पातील पाणी शंभर टक्केच्या जवळपास आल्याने पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेशही संबंधित प्रकल्पांनी प्रसारित केला.मुखेड,देगलूर,बिलोली,नायगांव, तालुक्यातील लेंडी,मांजरा, मन्याड नदी अगदी धोकादायक परिस्थितीत दुथडी भरून वाहत होती.सततचा पाऊस व पाण्याचा विसर्ग आदि कारणांनी 'बॅकवाटर' चा धोका बळावत चालला होता.मांजरा नदी तिरावरील येसगी जुने,सगरोळी, बोळेगांव,हुनगुंदा आदि भागात पाणी साचू लागले होते.मन्याड नदी काठावरील तुपशेळगांव, वझरगा, अटकळी,टाकळी,आळंदी,जुनी थडीसावळी,खतगांव,थडी बोरगांव, रामपूर,चिटमोगरा, गळेगांव, केसराळी, दौलतापूर व इतरही गावांत पाणी पसरत चालले होते.कासराळी,आरळी,बेळकोणी,तळणी,कोल्हे बोरगांव आदि भागात पावसाने नाल्यांना पूर आल्याने काही गावात पाणी शिरले तर काही गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला होता.नरसी-बिलोली महामार्गावर तळणी गाव परिसरात रोडवरून पाणी वाहत असल्याने रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विक्रम हराळे यांनी काही काळ वाहतूक थांबवलेली होती.काही गावांचा रस्ते बंद होते.

संततधार पाऊस,पाण्याचा विसर्ग व बॅकवाटरच्या पाण्याने अनेक गावांत भितीचे वातावरण पसरले होते.शेतोशेती पाऊस साचल्याने सोयाबीन पीक पुरते बुडाल्याचे सद्यस्थितीत चिञ होते. नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील टाकळी-वझरगा वाहणाऱ्या मन्याड नदीच्या विस्तीर्ण पाञामुळे वाहतूक खोळंबली होती. त्याठिकाणी देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी भेट दिली.आदमपूर बीट जमादार रामचंद्र काळे,पञकार माणिक सुर्यवंशी,मारोती भुसावळे,जाफर आदमपूरकर, पोलीस, महसूल,कृषी, विभाग आदि उपस्थित होते. राञीतून पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता व खबरदारी घ्यावी,असे प्रशासकीय अवाहन करण्यात आले आहे.