पत्रकार : प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियानास प्रारंभ करण्यात आला असून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नागरिकांच्या घरोघरी भेट देऊन एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत. नागरिकांनी फॉर्ममध्ये योग्य व संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह BLO यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष पुनरीक्षण मोहिमेद्वारे नव्या पात्र मतदारांचा समावेश, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर नागरिकांना दावे व हरकती नोंदविण्याची संधी दिली जाणार असून त्यांची छाननी करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अचूक मतदार यादी तयार होणे ही काळाची गरज असून नागरिकांच्या सहकार्यामुळे ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





Social Plugin