निळकंठ वसू प्रतिनिधी
आलेवाडी गावात आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सर्जा-राजा असलेल्या बैलांची सजावट, पूजा आणि मिरवणुकीने गावात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.
पहाटेपासूनच शेतकरी आपापल्या बैलांना अंघोळ घालून, रंगीबेरंगी हार, घंटा, मोरपिसांची टोपी, वाळ्याच्या माळा आणि झगमगाटी सजावटीत सजवू लागले. बैलांना पुरणपोळी, गूळ, हरभरा यांसारख्या नैवेद्याने पुरवले गेले. बैलांची पूजा करून शेतकऱ्यांनी त्यांच्या श्रमांचे कृतज्ञतेने स्मरण केले.दुपारी गावातील मुख्य रस्त्यावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लहान मुलांनी पारंपरिक वेशात सहभागी होत संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय केले. महिलांनी रांगोळ्या काढून, आरती करून सणाची शोभा वाढवली.
गावच्या प्रतिष्ठित मंडळींनीही उपस्थित राहून सणात सहभाग घेतला. पोळा हा शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे महत्त्व अधोरेखित करणारा सण असल्याने गावात वर्षानुवर्षे हा सण श्रद्धेने साजरा केला जात आहे.गावातील शांतता आणि एकोपा दर्शवणारा हा सण यंदाही उत्साहात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे
Social Plugin