प्रतिनिधी – निळकंठ वसू
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यात येऊन राहू लागली. तिच्या मदतीसाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी पुढाकार घेतला. त्यांनी संबंधित महिलेला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य दिलं.
या प्रकरणात महिलेच्या नातेवाईकांपैकी एक निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. या अधिकाऱ्यावर आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेऊन संबंधित तीन महिलांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. कोथरूड पोलिसांनी कोणताही वॉरंट न दाखवता मध्यरात्री या महिलांच्या घरी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेलं.
या कारवाईनंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पीडित महिलांनी तक्रार केली. मात्र पुणे पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली जात आहे. इतकंच नव्हे तर, मध्यरात्री घरात घुसून जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केल्याचा आरोप देखील या तक्रारीत करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुणे शहराचे पोलीस उपायुक्तांशी थेट संपर्क साधून तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी सांगितलं की, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांना जर संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळाली, तर एफआयआर नोंदवणं हे बंधनकारक आहे. कायदा म्हणजे कायदाच असतो!"
"एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच अन्याय होत असेल, तर हे लोकशाहीत लज्जास्पद आहे. पुणे पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत वागण्याऐवजी दबावाखाली चुकीची कारवाई केली, हे स्पष्ट आहे. आम्ही मागणी करतो की संबंधित पोलिसांवर तात्काळ निलंबनाची आणि फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करावी. जर कायद्याचा आणि महिला सुरक्षेचा आदर ठेवला गेला नाही, तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन उभारेल." – धैर्यवर्धन पुंडकर, महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी
या अन्यायकारक घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडी, पुणे जिल्हा समितीने पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन केलं असून, जर यापुढेही एफआयआर नोंदवण्यात टाळाटाळ झाली, तर एसपी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र ग्रामीण न्यूज
Social Plugin