पुसेगावात श्री सेवागिरी सेमिनार हॉलचे उत्साहात उद्घाटन
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] :
विद्यार्थ्यांनी मेरिट हा विषय डोक्यातून काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. जिद्द, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची सूत्रे आहेत. प्रयत्न कराल तर स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले. येथील श्री सेवागिरी महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रातील सेमिनार हॉलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, जीएसटी पुणेचे माजी अप्पर आयुक्त विलास इंदलकर, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे कार्यकारी संचालक सुधीर भंडारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त देविदास क्षीरसागर, फाउंडेशनचे चेअरमन माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव, ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर, निवृत्त न्यायाधीश मखरे, राष्ट्रपती पारितोषक प्राप्त राम जाधव, किशोर जाधव, अजय जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, कार्यकारी समितीचे सदस्य राजेश देशमुख, डी. एन. जाधव फाउंडेशनचे सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. कोकाटे पुढे म्हणाले, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, जागा मोजक्याच असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देत असताना, बँकिंग आणि अन्य क्षेत्रांतील नोकरीचाही पर्याय निवडावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून आयोग उमेदवाराचा बौद्धिक क्षमतेचा शोध घेते, त्यामुळे उमेदवारांनी आत्मविश्वासने परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्लाही दिला.
सुरेश जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांच्यात भरपूर टॅलेंट आहे. मात्र त्यांना स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने दिशा मिळत नाही. त्यांना पुणे, मुंबई आणि दिल्लीच्या धर्तीवर आपल्या भागात सुविधा उपलब्ध झाल्याने ही अभ्यासिका दिशादर्शक ठरत आहे.
दरम्यान, अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आर्किटेक्चर अनिरुद्ध देशमुख यांचा विशेष सन्मान झाला. विलास इंदलकर यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअर विषयी मार्गदर्शन केले. देविदास क्षीरसागर, डॉ. सुरेश जाधव, सुधीर भंडारे, ऐश्वर्या माने यांनी मनोगत व्यक्त केले.
ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी प्रास्ताविक केले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर जाधव यांनी आभार मानले.
Social Plugin