सुनील देवधर; पुसेगावात सेवागिरी व्याख्यानमालेत गुंफले 'अखंड राष्ट्रीयत्व'वर चौथे पुष्प
बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
ब्रिटिशांनी आपण 'राष्ट्र' नव्हतो, ही भावना समाजमनात रुजवली. भलेही भारतात भाषा, पेहराव, आहार यात भिन्नता असेल. तरी संस्कृती, संकल्पना, परंपरा एकसारख्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कर्तव्येसुद्धा एकसारखी आहेत. भारताची खरी शक्ती त्याच्या सांस्कृतिक मुळांमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुनील देवधर यांनी केले.
प. पू. श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने काल येथे आयोजित श्री सेवागिरी व्याख्यानमालेत 'अखंडराष्ट्रीयत्व' या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव,
बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवरांसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. देवधर म्हणाले, "सर्व महापुरुषांनी आपले जीवन एका जातीसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी समर्पित केले. त्याकाळी जवळपास सर्वच महापुरुषांना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, आज इतकी वर्षे लोटली तरी पुन्हा या महापुरुषांना आपण जातीपातीच्या तुरुंगात डांबत आहोत, ही दुर्दैवाची बाब आहे."
वेदांमध्ये राष्ट्राला आई म्हटले आहे. त्यामुळे आपोआपच आपण सगळी भावंडे आहोत. समाजात भेदाभेद, उच्चनीचता, स्पृश्य-अस्पृश्यता या सगळ्या चुकीच्या गोष्टी रुजल्या गेल्या आहेत. परिणामी जातीभेदामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काळात जातीपाती संपुष्टात आणण्याचे काम संतांनी केले." त्यामुळे प्रत्येकाने संतसाहित्य आणि महापुरुषांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रत्येकाने आपल्या जीवनातील रोजचे तीन ते चार तास सामाजिक कार्यासाठी आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी दिले पाहिजेत. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री. देवधर यांनी केले.
.jpg)




Social Plugin