अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.त्यांच्या पिकांचे,जमिनीचे,तसेच भविष्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याचे नाटक सुरू आहे.शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या या सरकारला आता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.शेतकऱ्यांना तातडीने मदत केली नाही,तर मुख्यमंत्री व मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.ते दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी जालन्यातील खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत खा. डॉ.कल्याण काळे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शहराध्यक्ष अतिक खान,राजेंद्र राख,कल्याण दळे तसेच सर्व तालुकाध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते.
सकाळी पैठण व अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून ते जालन्यात दाखल झाले होते.सपकाळ म्हणाले की मंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतात जाऊन फक्त फोटोशूट करतात,पण मदतीच्या बाबतीत कोणतेही ठोस निर्णय घेत नाहीत.२८८ आमदारांपैकी तब्बल २४० आमदार सरकारच्या पाठीशी आहेत,तरीही शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण राबवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे हे सरकार जनतेच्या हिताचे नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राज्यात तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांना कर्जाचा तगादा लावू नये व कर्जमाफी करावी,पंचनाम्याच्या नाटकाऐवजी थेट आर्थिक मदत द्यावी,दसऱ्यापूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,ज्यांची शेती वाहून गेली त्यांना एकरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी,
आगामी हंगामासाठी मुफ्त बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत,सपकाळ यांनी पुढे सांगितले की,राज्यातील ३०० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये तिपटीहून अधिक पाऊस झाला आहे.शेतकऱ्यांचे पिके,मालमत्ता,जमीन वाहून गेली आहे.तरीदेखील सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे.
याचबरोबर पिकविमा योजनेतील घोटाळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.पिकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघडपणे फसवणूक झाली असून आजही अनेक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही,असे ते म्हणाले.शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण करणारे हे सरकार जनतेच्या रोषापासून वाचू शकणार नाही,असा इशारा सपकाळ यांनी दिला.





Social Plugin