Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान; भालगाव येथील शेतकऱ्यांची पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतःभालगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन,कापूस,तूर,मूग,ऊस,मोसंबी अशा विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.

भालगाव गावाच्या वर असलेल्या भाटखेडा पाझर तलाव पूर्ण भरला असून,त्यातील पाण्याचा विसर्ग भद्रायणी नदीत होत आहे.यामुळे नदीला पूर येऊन आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली असून,शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. भालगाव येथील शेतकरी सिद्धेश्वर रमेशराव मुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून,प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी."

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित शेतात जाऊन पाहणी करावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. या संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.