*राष्ट्रीय थांगता स्पर्धेसाठी झाली निवड*
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर तालुका खटाव या शाळेचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी आयुष अनिल मदने व याच शाळेची माजी विद्यार्थिनी सिद्धी अंकुश लवंगारे या दोन्ही विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय थांगता कराटे स्पर्धेत अव्वल कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले.
अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय थांगता स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक जिल्ह्यांचे स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करताना बॉईज गटातून आयुष मदने आणि गर्ल्स गटातून सिद्धी लवंगारे यांची निवड झाली होती. ही निवड सार्थ ठरवत अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन विजय प्राप्त करून आयुष आणि सिद्धी यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयानंतर या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून आयुष मदने हा बॉईज गटातून गोवा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी खेळणार असून सिद्धी लवंगारे ही खेळाडू आसाम या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.आजवर या दोन्हीही विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा यामध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात दोन्ही स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी आजवर अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत.थांगता स्पर्धेतील या उत्तुंग यशाबद्दल या दोन्हीही खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद केंद्रशाळा राजापूर यांच्यावतीने नुकताच या यशस्वी खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशस्वी खेळाडू, त्यांचे पालक व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक अजित घाटगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. विनोद गोडसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षिका सुवर्णा घनवट, सपना राऊत, अमृता शेवते यांनी स्वागत केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर अमित भिसे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.सरपंच वनिता पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश घनवट, राजेंद्रबापू पाटील, दशरथ घनवट, ज्योतीराम घनवट, हणमंत घनवट, नारायण घनवट, रामदास डंगारे आदि विविध मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे व पालकांचे अभिनंदन केले.





Social Plugin