Ticker

6/recent/ticker-posts

जन्मगाव हेच माझं कुटुंब: तुषार वाघ



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

जन्मभूमी हेच माझं कुटुंब आहे ही भावना मनाशी बाळगून येत्या काळात गावातील होतकरू युवकांना हाताशी धरून  मला गावच्या उन्नतीसाठी काम करायचं आहे.  गावच्या समविचारी सुपुत्रांची सोबत घेऊन कृषी, जल, मृदु , आरोग्य व शिक्षण या घटकांवर काम करत गाव स्वयंपूर्ण बनवण्याचे व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभंग सोशल फाऊंडेशनची स्थापना करत असल्याचे मंत्रालय जॉइंट डायरेक्टर (महाराष्ट्र - गोवा ) तुषार वाघ यांनी जाहीर केले.

             लोणी (ता. खटाव) येथे अभंग सोशल फाऊंडेशन सेवाभावी संस्थेच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून ते बोलत होते. या प्रसंगी सीईओ खोपोली शिवराज डोंगरे,सहायक पोलीस निरीक्षक रणधीर कर्चे, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, तुषार वाघ यांचे वडील मोहनराव वाघ, अभंग फाऊंडेशन संचालक आकाश निंबाळकर,पीडब्लूडी चे संदीप देवकर, कराड अर्बन बँकेचे लीगल हेड सागर पाटील, सेट्रीज संस्थेचे राज्य समन्वयक चैतन्य जोशी व पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित होते.

                   तुषार वाघ यांनी अभंग सोशल फाऊंडेशन च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्रचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला लोणी व पंचक्रोशीतील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिरात ७००  नेत्रारुग्णांची तपासणी झाली व ४११ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ६६ रुग्णांची पुणे येथील नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात  आले. यावेळी लोणी,भोसरे, वरूड, कोकराळे, धकटवाडी, अंभेरी व जायगांव येथील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रणधीर कर्चे,श्रीकांत शेंडे, सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्वंभर रणनवरे, सूत्रसंचालन विनोद निकम यांनी केले व आभार धनकुमार शिंदे यांनी मानले.