Ticker

6/recent/ticker-posts

शेतीला मिळणार 'एआय'चा बुस्टर


बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

निढळ हे सातारा जिल्ह्यातील एक छोटसं गाव आहे. जे एकेकाळी दुष्काळ आणि गरिबीने ग्रस्त होते. परंतु या गावचे पुत्र, पुणे विभागाचे माजी आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी निढळकरांच्या मदतीने परिपूर्ण ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. बारामती येथील 'ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' यांच्या मदतीने निढळमध्ये शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस शेतीचा प्रारंभ करण्यात आला. या क्रांतिकारक निर्णयामुळे कमी खर्चात, अधिक उत्पादनामुळे निढळमधील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्टया समृद्ध होण्यास मदत होणार आहे. नुकताच निढळ येथे चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते ऊस शेतीत नवी क्रांती घडविणाऱ्या 'मेन वेदर स्टेशन'चा प्रारंभ करण्यात आला.

ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल

सातारा जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणेच खटाव तालुक्यातील निढळ हे गाव सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित, तुटपुंजा पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगाराचा अभाव अशा अनेक समस्यांनी या गावातील नागरिकांना ग्रासले होते. मात्र, या गावचे पुत्र, निवृत्त आय.ए.एस. चंद्रकांत दळवी यांनी प्रशासकीय जबाबदारी बरोबर १९८३ पासून गावातील ग्रामस्थांना एकत्रित घेत निढळ हे आदर्श गाव करण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी निढळकरांच्या लोकसहभागाच्या मदतीने जोमाने काम सुरू केले आणि अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या निढळ गावात डोंगरमाथा ते पायथा डीप सीसीटी, साखळी सिमेंट बंधारे, जलसंधारण, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, तंटामुक्ती, वृक्षारोपण मोहीम, चराई व कुऱ्हाड बंदी केली. निढळ हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र, आजमितीला हे गाव ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल म्हणून भारतात पाहिले जाते.

अद्ययावत सेवा-सुविधा

मंत्रालयातल्या सोयी सुविधांप्रमाणे ग्रामसचिवालय, विकास सेवा सोसायटीत इमारती केल्या. गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी अद्ययावत इमारती व भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. एखाद्या स्मार्ट सिटीतील अद्ययावत उद्यान असते, त्याप्रमाणे निढळमध्ये उद्यान उभारून कायापालट केला. आज भारतात हे परिपूर्ण स्वतंत्र ओळख या गावाने निर्माण केली आहे. 

निढळकरांची दुष्काळावर मात

निढळ येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत होती. अथवा टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत होता. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार चंद्रकांत दळवी यांनी मांडला. केवळ शासनावर विसंबून न राहता पूर्ण गावाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आसपासचा डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर माथा ते पायथा डीप.सी.सी.टी, ओढ्यावर साखळी सिमेंट बंधारे, मातीनाला बांधासह पाणलोटचे सर्व प्रयोग यशस्वी केले. डोंगर, पडीक क्षेत्र व शेताच्या बांधांवर वृक्षारोपण करुन मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली. ग्रामवन उपक्रम राबवून हरितक्रांती निर्माण केली. पावसाचे पाणी अडवण्यासाठी पाझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततळी घेतली. काही वर्षात श्रमदानातून लावलेली झाडे आता जंगल वाटावीत एवढी मोठी आणि हिरवीगार झाली आहेत.

तलाव, शेततळी भरून वाहू लागली

पाणी अडवा- पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरीत्या राबवल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडले-जिरले. त्याचा परिणाम गावातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळीतही वाढ झाली. पूर्वी भूगर्भात ४०० ते ५५० फुटावर लागणारे पाणी आता ३५ ते ६० फुटांवर आले आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविल्याने तळाला गेलेल्या विहिरी नितळ पाण्याने भरून गेल्या. पाझर तलाव, शेततळी भरून वाहू लागली. गाव बेसाल्ट खडकावर वसलेले आहे. त्यामुळे गावर्क­यांनी ओढ्यांच्या आतमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्फोट घडवून आणून जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा निर्माण केली. त्याला जोडून माथा ते पायथा या पद्धतीने पाणी अडवले, पाणी वापराचा ताळेबंद निश्चित केला. त्यातून पाण्याचा संचय वाढला. यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झाले. गावात पाणी आले तसे समृद्धी आली आणि यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारली.

एआय तंत्रज्ञानातून ऊस शेती पिकणार

आजच्या काळात शेती करणे ही केवळ मेहनतीची बाब राहिलेली नाही, तर माहिती, तंत्रज्ञान आणि शास्त्रीय नियोजन यांची जोड शेतीला समृद्ध बनवत आहे. यातच आता एक नवे शस्त्र शेतकऱ्यांच्या हाती आले आहे - ते म्हणजे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता). दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे नवनवीन कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच काही शेतकरी खते, कीटकनाशके आणि पाण्याच्या अनावश्यक अधिक वापर करतात. परिणामी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च वाढत चालला असून, उसाची उत्पादकता व साखर उतारा कमी झाला आहे. यावर मात करण्यासाठी चंद्रकांत दळवी यांच्या प्रयत्नातून निढळच्या पाच किलोमीटर परिसरातील ऊस लागवड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून केली जाणार आहे. 

असा होईल एआयचा वापर

यात सॅटेलाइट मॅपिंगच्या मदतीने निवडलेल्या प्रक्षेत्रावरील मातीचे परिक्षण व अभ्यास केला जाईल. प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान केंद्र, अत्याधुनिक सेन्सरची स्थापना केली गेल्याने त्यापासून माहितीचे संकलन केले जाणार आहे. निर्देशित पद्धतीने मशागतीसह ऊस लागवड व संपूर्ण पिकाचे व्यवस्थापन केले जाणार असल्याने उत्पादनात निश्चित वाढ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत इंटरॅक्टिव्ह व यूजर फ्रेंडली डॅशबोर्डच्या मदतीने शेतकऱ्यांना हीट मॅप, सॅटेलाइट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रेकमंडेशन सिस्टिम, इरिगेशन मॅनेजमेंट, न्यूट्रियंट मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॉनिटरिंग आदी  घटकांची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. 

अचूक माहिती मिळणार

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अचूक माहितीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. तर पिकात लावलेल्या अत्याधुनिक सेन्सर प्रणालीमुळे मातीचा सामू, क्षारता, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश व हवामानातील माहिती वेळीच उपलब्ध होईल. त्याचा पाणी, खत वापर आणि कीड व रोग नियंत्रणासाठी मदत होईल. हायपरस्पेक्ट्रल कॅमेऱ्याद्वारे पिकाचे नियमित निरीक्षण करून आवश्यक तिथेच खते व कीडनाशके यांचा वापर करता येईल. परिणामी, खतांच्या योग्य वापरामुळे सुपीकतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

मोबाईलवर अपडेट

लागवडपूर्व ते तोडणीपर्यंत सातत्याने मातीतील ओलावा व पोषक घटकांची माहिती रोज मोबाईलवर येणार असल्याने शेतकऱ्यांना सिंचन व खत व्यवस्थापन अचूक करता येणार आहे. परिणामी, शास्त्रीय व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ आणि खर्चात बचत शक्य होणार आहे. तसेच पिकाची अचूक वेळी काढणी केल्यामुळे अपेक्षित वजन व साखर उतारा मिळविण्यासाठीही फायदा होणार आहे.


राज्यात ऊस क्षेत्र मोठे असले तरी साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध नाही. त्यामुळे एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाच्या वापर हेच उत्तर आहे. 'एआय'मुळे ऊस पिकासह शेतीचे अर्थकारण बदलून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे. - चंद्रकांत दळवीचेअरमन, रयत शिक्षण संस्था. 


निढळ गावाला मिळालेले पुरस्कार -

- भारत सरकारचा निर्मलग्राम पुरस्कार

- जलसंवर्धनाच्या कामासाठी केंद्र शासनाचे नॅशनल वॉटर अवॉर्ड

- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार

- महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार

- महाराष्ट्र शासनाचा इको व्हिलेज पुरस्कार

- महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम वनग्राम राज्यस्तरीय पुरस्कार

- सार्क व्हिलेजसाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निढळची शिफारस

- शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी हनुमान विद्यालय निढळला रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर आदर्श हायस्कूल पुरस्कार