प्रतिनिधी ( सोमनाथ काळे):-
चाकण हे औद्योगिक आणि कृषी विकासाचे केंद्र असून येथील वाहतूक समस्या केवळ स्थानिक मर्यादेत न राहता संपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. वर्षानुवर्षे चाकण शहरातील भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. या कोंडीमुळे उद्योग, व्यापार आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून केवळ कागदी हालचाली आणि रिकाम्या आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या निष्क्रियतेविरोधात आणि कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीद्वारे “चाकण ते आकुर्डी” असा पायी धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जागरूक नागरिक, व्यापारी, उद्योग प्रतिनिधी, यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार मा. श्री. अमोल कोल्हे साहेब, खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळे, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सुधीर भाऊ मुंगसे आणि त्रस्त चाकणकर नागरिक या मोर्चात उपस्थित होते.
या मोर्चादरम्यान PMRDA कार्यालयात प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीने स्पष्ट मागणी केली की, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी नव्हे, तर कॉम्प्रिहेन्सीव मोबिलिटी प्लॅन अंतर्गत शाश्वत वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात यावी. गेल्या सहा वर्षांपासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही निर्णय न झाल्याने नागरिकांचा संयम संपला असून प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे, असा ठाम संदेश या जनआंदोलनातून देण्यात आला.
ट्रॅफिकमुक्त चाकणसाठी सुरू झालेला हा एल्गार म्हणजे नागरिकांच्या जगण्याचा, सन्मानाचा आणि विकासाचा लढा आहे. जोपर्यंत चाकणच्या रस्त्यांवरील कोंडी सुटत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक जोमाने सुरू राहणार आहे, असा इशारा यावेळी समितीच्या माध्यमातून दिला.





Social Plugin