बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
अतिवृष्टी आणि सीना नदीच्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. शेती वाहून गेली आहे, तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या गावांतील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत बाधित शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चाऱ्याचे वाटप केले.
राज्यात यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळं मोहोळ तालुक्यात पूरस्थिती उद्भवली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान होऊन हजारो गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळित झालंआहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. ट्रस्टने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त मुंढेवाडी, वनखळ या परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचीअडचण पाहता प्रत्यक्ष बाधित पशुधनाच्या मालकांना मुरघासाचे वाटप केले.
याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोषजाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, मोहोळचे नायब तहसीलदार धाईंजे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, श्री सेवागिरी देवस्थान हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांमधून आपले योगदान देत आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील आपत्कालीन प्रसंगी ट्रस्ट वारंवार मदतीचा हात पुढे करते. अतिवृष्टी आणि पूरस्थितीने बाधित झालेल्या शेतकरी कुटुंबांसाठी दिलेली ही मदत मोलाची ठरेल, असा विश्वास ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आला .





Social Plugin