दर 'जैसे थे'; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] खटाव तालुक्यात सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे खते, औषधे व मशागतीचा खर्च वाढत असून, दुसरीकडे सोयाबीनला भाव मिळत नाही. सोयाबीनचा दर वाढण्याच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी विक्री न करता सोयाबीनची साठवून ठेवले आहे. मात्र, दिवाळी संपली, तरी सोयाबीनचे भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांच्या कोंडीत सापडला आहे.
यावर्षी जास्त पावसामुळे, तसेच पुरामुळे पिकांसोबत शेतकऱ्याची स्वप्नेही वाहून गेली आहेत. तालुक्यात यावर्षी पावसाने सोयाबीन व इतर पिकांची पूर्ण नुकसान झाले आहे. पावसाने सर्वत्र दाणादाण केली आहे. परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन पिकालाही बसला. त्यामुळे शेतकऱ्याचे
मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचून राहिल्याने सोयाबीन काढणे जिकिरीचे बनले होते. सोयाबीन काढणीचे व गंज लावण्याचे काम करणाऱ्यांचा भाव वाढला आहे. शेतात पाणी असल्याचे कारण सांगून मजुरांचे दर वाढले आहेत.
यंदा सोयाबीन काढणीचा एकरी दर पाच हजारांपर्यंत गेला आहे. गेल्या वेळी सोयाबीन पीक चांगले आले तर एकरी सरासरी १२ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत होते. मळणी यंत्र चालकांनी गेल्या वर्षर्षीपेक्षा दर वाढविले आहे. यावर्षी ४०० रुपये पोते इतका दर आहे. अतिपावसामुळे एकरी उत्पादन कमी झाल्यामुळे, तसेच बाजारभावही कमी झाल्याने घटलेले भांडवलही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात भरीस भर काढणी व गंज लावण्याच्या कामासाठी मजुरांनी मजुरीचा दर वाढविल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सोयाबीनचा भाव अवघा ४२०० रुपये आहे. एकरी उत्पादन सहा क्विंटल झाले आहे. सुरुवातीच्या मशागतीपासून ते सोयाबीन विक्रीपर्यंत सर्व खर्च वजा करता कुटुंबातील सर्व सदस्यांचे कष्ट सोडले, तर शेतकऱ्यांच्या हाती एकरी पाच ते सहा हजार रुपये लागतात. यावर कुटुंबाचा वर्षभराचा गाडा हाकायचा कसा? असा प्रश्न आहे. कोट- गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी सोयाबीनचा दर सरासरी तेवढाच आहे. तुलनेने खत, औषधे, मजुरी व मशागतीचा खर्च असामान्य झाला आहे. सरकारने आमच्या कष्टाची कदर करावी व कष्टाला न्याय द्यावा.
- गणेश शिंदे, शेतकरी, जांब चौकट = पंचनामे झाले; भरपाईचे काय ?
खटाव तालुक्यात खरिपातील इतर पिकेही वाया गेली आहेत. त्यात नुकसान भरपाईनेही पाठ फिरवली आहे. केवळ पंचनाम्यासाठी धावपळ केल्याचे दिसून आले; परंतु भरपाई व विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा शेतीमालाला भाव नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून आले . छायाचित्र - जांब (ता. खटाव) भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात सोयाबीनचा लावलेला ढीग. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध





Social Plugin