Ticker

6/recent/ticker-posts

कांद्याच्या पिकात फिरवला रोटावेटर,



उत्पादन खर्च अन् उतरलेल्या दराचा फटका

बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]  दरूज (ता. खटाव) येथील चंद्रकांत बरकडे यांच्या एक एकर क्षेत्रात असलेल्या लाल कांद्यात रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सद्यःस्थितीत कांद्याला मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नसल्याने हवालदिल झाल्याने बरकडे यांनी हा रोटावेटर फिरवला.

सुरुवातीला दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांवर मात करून बरकडे यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवला होता. आजपर्यंत कांद्याला ५० हजार रुपये खर्च आला आहे आणि कांद्याला सद्यःस्थितीत मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. परिणामी, बरकडे यांना मोठा फटका बसला आहे. एवढ्या कष्टाने घेतलेलं पीक शेवटी रोटावेटरखाली गाडावं लागल्याचं दुःख बरकडे व कुटुंबातील सदस्यांना सहन करावे लागले आहे.

तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं कांद्याचं पीक घेतलं होतं. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने दिवाळी जोरात साजरी झाली होती. मात्र, यंदा नुसता पाऊसच नव्हे, तर भाव नसल्यानेही सर्वच शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. पावसाने कांदा पिकाला फटका दिला असतानाही शेतकऱ्यांनी मेहनतीने जगवला; पण बाजारभाव इतका घसरला, की कांदा विकणेच परवडेनासे झाले. योग्य भाव मिळत नसल्याने नफा सोडाच, उलट तोटा होतोय. मजुरी, वाहतूक खर्च जाऊन उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांनी हा कांदा शेतातच फेकून दिला, तर काहींनी संतापाच्या भरात त्यावर थेट रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलं.

चौकट- मार्केटमध्ये कांदा न्यायचा झाला, तर त्याला काढणी आणि वाहतुकीचा खर्च येत असतो. मार्केटमध्ये व्यापारी दर पाडून कांदा मागतो. मग त्यात काढणी आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही. त्यामुळे अगोदरच एवढा मोठा खर्च झाला आहे आणि आता आणखी कर्जात जाण्यापेक्षा तो जागेवरच नासवलेला बरा या विचाराने रोटावेटर फिरवला.

चंद्रकांत बरकडे, शेतकरी (दरुज, ता. खटाव)         छायाचित्र _ दरूज (ता. खटाव): दराअभावी एकरभर कांदा पिकात रोटावेटर फिरवताना चंद्रकांत बरकडे. छाया -प्रकाश राजेघाटगे बुध