Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळेश्वर संघटनेचे कार्य सेवेच्या भावनेतून ,प्रदीप विधाते; खटावमध्ये स्नेहमेळावा, निवडणुका निर्णायक असल्याची स्पष्टोक्ती



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

पिंपळेश्वर संघटना ही सत्तेसाठी नव्हे, तर सेवेच्या भावनेतून कार्य करत आहे. गेल्या काही वर्षांत राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली, तरी संघटनेचा कार्यकर्ता एकदिलाने संघटित राहिला. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत ही अनमोल संपत्ती कमावली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी केले.खटाव येथे पिंपळेश्वर संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी दिलीप जाधव, भिकू मोहिते, किशोर डंगारे, सतीश शिंदे, मुगुटराव पवार, प्रमोदकांबळे, रशीद शिकलगार, अजीज झारी, विजय बोबडे, महेश देशमुख, एकनाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. विधाते म्हणाले, "सध्या विविध चर्चा व अफवा पसरत असल्या, तरी कुणाशीही कोणतीही बैठक झालेली नाही. युतीसंदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य व जिल्हा नेतृत्वाकडूनच घेतला जाणार आहे. त्यानुसारच पुढील राजकीय भूमिका निश्चित केली जाईल."युतीबाबत सध्या स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा किंवा बैठक झालेली नसल्याचे सांगून श्री. विधाते म्हणाले, "फक्त अफवा आणि गैरसमज पसरवले जात आहेत. कार्यकर्ते आणि संघटना यांची शक्ती टिकवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. चर्चा करून सर्वानुमतेच निर्णय घेतला जाईल."

रसूलभाई मुल्ला आणि मनोज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. पिंपळेश्वर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयदीप शिंदे यांनी स्वागत केले. माजी सरपंच बबनराव घाडगे यांनी आभार मानले. 

वरिष्ठांच्या आदेशानुसार लढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. स्थानिक पातळीवर युती झाली, तर पिंपळेश्वर संघटनेचा सन्मान अबाधित ठेवूनच होईल. संघटना गहाण ठेवून कोणतीही युती होणार नाही. युती न झाल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार खटाव जिल्हा परिषद गट आगामी निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार आहे, असे विधाते यांनी सांगितले.