Ticker

6/recent/ticker-posts

रणसिंगवाडी येथे रविवारी कलशारोहन व मूर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळा



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे श्री भैरवनाथ-जोगेश्वरी, श्री लक्ष्मीमाता, श्री हनुमान, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज मूर्ति प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा रविवारी (ता. 30) साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

कलशारोहन व मूर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शनिवार (ता. 29) रोजी दुपारी 4 वाजता सनई चौघडे व पारंपरिक वाद्यांच्या साथीने देवतांच्या मूर्त्यांची ग्रामप्रदक्षिणा (शोभा यात्रा) निघेल. रात्री 10 नंतर त्रिवेणी संगम भजन मंडळ बुध, डिस्कळ, राजापूर, भजन मंडळ वेटणे व रणसिंगवाडी यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल. 

रविवारी (ता.30) सकाळी सात ते दुपारी एक वेदशास्त्रसंपन्न नंदकुमार जोशी वरुडकर, विलास कुलकर्णी काका निढळकर व सहकारी यांच्या पौराहित्याखाली शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी संपन्न होतील.

दुपारी 12.15 ते 1.15 या वेळेत पंचदशनाम जुना आखाडा, वाराणसीचे पूर्व आंतरराष्ट्रीय महामंत्री तथा बिलेश्वर महादेव मंदिर, वडीयावीर, गुजरातचे थानापती महंत श्री शांतिगिरीजी महाराज व अकलूज येथील श्री ज्ञानाई गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प.सुरेशजी सुळ महाराज यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ति प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा संपन्न होईल. दुपारी दोन वाजता साधुमहात्म्यांचे आशीर्वाचन व दर्शन सोहळा होईल. दुपारी दोन नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

दुपारी 2 ते 5 वाजता गावातील माहेरवासिनिंचा सत्कार सोहळा व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. रात्री  9 ते 11 वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील ह.भ.प. संजय महाराज साळुंखे निगडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.

तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी भजन, हरिकीर्तन व अन्नदान अशा विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती रणसिंगवाडी ग्रामस्थांनी केली आहे.